दोन कोविड रुग्णालयांना १.७५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:10+5:302021-06-02T04:11:10+5:30
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांद्वारा नियुक्त तपासणी पथकाच्या निदर्शनात आलेल्या त्रुटी व कोरोना रुग्णांसाठीचे पावती पुस्तक नसल्याची खोटी माहिती देणे यासह ...

दोन कोविड रुग्णालयांना १.७५ लाखांचा दंड
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांद्वारा नियुक्त तपासणी पथकाच्या निदर्शनात आलेल्या त्रुटी व कोरोना रुग्णांसाठीचे पावती पुस्तक नसल्याची खोटी माहिती देणे यासह अन्य कारणे येथील पारश्री व चांदूरबाजार येथील आरोग्यम् रुग्णालयाला चांगलेच भोवले. या रुग्णालयांना १.७५ लाखांचा दंड जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठोठावला.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाच्या ऑडिटसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्या नेतृत्वात दर तीन कोविड रुग्णालयांसाठी एक याप्रमाणे पथकांची नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार सध्या कोविड हॉस्पिटलचे ऑडिट सुरू आहे. यात एका तक्रारीच्या अनुषंगाने १९ एप्रिल रोजी पथकाने येथील पारश्री हॉस्पिटलची तपासणी केली. यावेळी हॉस्पिटलच्या दर्शनी भागावर शासकीय दरपत्रक नसल्याचे आढळून आले. कोविड रुग्णासाठीचे पावती पुस्तक, कॅश मेमो पथकाने मागितले असता, उपलब्ध नसल्याची खोटी माहिती देण्यात आली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने हॉस्पिटलला नोटीस बजावल्याचे लंके म्हणाले.
यावर पारश्री हॉस्पिटलद्वारा २४ एप्रिल रोजी खुलासा सादर करण्यात आला. मात्र, तो असमाधानकारक असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सदर हॉस्पिटलला एक लाख रुपये दंड ठोठावला. ही दंडाची रक्कम सात दिवसांच्या आत महापालिकेकडे जमा करावी लागणार आहे. कुणीही कच्च्या स्वरूपातील बिल कुठल्याही कोविड हॉस्पिटलकडून न स्वीकारता पक्के बिल घ्यावे, बिलाचा भरणा धनादेश, आरटीजीएस, एनईएफटी याद्वारे करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बॉक्स
आरोग्यम् हॉस्पिटलला ७५ हजारांचा दंड
जिल्हा पथकाने केलेल्या पाहणीत चांदूर बाजार येथील आरोग्यम् हॉस्पिटलमध्ये शासकीय दरपत्रक लावण्यात आलेले नाही. पीपीई किटचा वापर नाही व रुग्णालयात पुरेसा स्टॅाफ नाही, यासह अन्य कारणे त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे या कोरोना आरोग्यम् कोरोना हॉस्पिटलला ७५ हजारांचा दंड जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ठोठाल्याची माहिती पथकाचे जिल्हा पथकप्रमुख राम लंके यांनी दिली.