दोन चिमुकल्यांचे अपहरण करणाऱ्या महिलेला पकडले ?
By Admin | Updated: October 10, 2015 00:49 IST2015-10-10T00:49:07+5:302015-10-10T00:49:07+5:30
दोन चिमुकल्यांचे अपहरण करून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलेला प्रवाशांनी पकडून वलगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.

दोन चिमुकल्यांचे अपहरण करणाऱ्या महिलेला पकडले ?
शहानिशा करून सोडले : वलगाव ठाण्यात गोंधळ
अमरावती : दोन चिमुकल्यांचे अपहरण करून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलेला प्रवाशांनी पकडून वलगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी महिलेची चौकशी करून अपहरणाबाबत शहानिशा केली, मात्र, घटनेत तथ्य आढळून न आल्याने त्या महिलेला डेपो व्यवस्थापकाच्या ताब्यात देण्याचा सल्ला देऊन पोलिसांनी सोडून दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी वलगाव ठाण्यात घडली.
अकोटवरून नागपूर जाणाऱ्या एसटीत महिला तीन ते चार वयोगटातील दोन चिमुकल्यांना घेऊन प्रवास करीत असल्याचे प्रवासी व वाहकांना आढळून आले. ती संशयास्पद स्थितीत प्रवास करीत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बस वलगाव ठाण्यासमोर थांबविण्यास सांगून त्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनीही महिलेची चौकशी सुरू करून तिच्याजवळील दोन मुलांना विचारपूस केली. मात्र, अपहरणाबाबत कोणतेही पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे महिलेला सोडून दिले. बस डेपोमार्फत पुढील चौकशीची दिशा ठरवावी, अशा सूचना वलगाव पोलिसांनी दिल्या. (प्रतिनिधी)