कारागृहात दोन बंदी संक्रमित, कोविड हेल्थ सेंटर रिकामेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:22+5:302020-12-11T04:38:22+5:30
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात हल्ली केवळ दोन बंदीजन संक्रमित असून, कारागृहाचे कोविड हेल्थ सेंटर रिकामेच आहे. मे ते ...

कारागृहात दोन बंदी संक्रमित, कोविड हेल्थ सेंटर रिकामेच
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात हल्ली केवळ दोन बंदीजन संक्रमित असून, कारागृहाचे कोविड हेल्थ सेंटर रिकामेच आहे. मे ते सप्टेंबर यादरम्यान कोरोनाचे असलेले भय आता तेवढे नाही. परिणामी कारागृहातून कोरोना परतीच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे.
कारागृहात मेपासून कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर बंदीजनांसाठी नियमावली लागू करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५ दिवसांपर्यत तात्पुरत्या कारागृहात बंदीजनांचा मुक्काम होता. दरम्यान कोविड चाचणी, वैद्यकीय तपासणी आदी बाबी पूर्ण झाल्यानंतर जुने कारागृहात रवानगी, अशी प्रक्रिया आजही सुरू आहे. मात्र, ऑक्टोबरपासून कोरोना संक्रमणात कमालीची घट झाली आहे. यापूर्वी कारागृहात महिन्याला २० ते २५ संक्रमित बंदीजन आढळून येत होते. मात्र, आता केवळ दोनच बंदीजन संक्रमित असून, सुपर स्पेशालिटी कोविड रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. या दोनही बंदीजनांची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय अधिकारी एफ.आय. थोरात यांनी सांगितले. यापूर्वी कोरोनामुळे एक कर्मचारी व एक बंदी दगावल्याची माहिती आहे. कारागृहाने होम गार्ड कार्यालयात साकारलेल्या कोविड हेल्थ सेंटर रिकामेच आहे. दररोज वैद्यकीय तपासणीदरम्यान बंदीजनांत कोरोनाचे लक्षणे दिसून येत नाही, असेही डॉ, थोरात म्हणाले. संक्रमित १४५ पैकी दोघांचा मृत्यू झाला असून. इतरांनी कोरोनावर मात केल्याचे वास्तव आहे.