आठवड्यातील दोन तास अभ्यागतांसाठी
By Admin | Updated: June 30, 2016 00:21 IST2016-06-30T00:21:24+5:302016-06-30T00:21:24+5:30
आठवड्यातील किमान दोन तास पुनर्वनियोजित भेटी व्यतिरिक्त येणाऱ्या अभ्यागतांना देण्यात यावेत, अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

आठवड्यातील दोन तास अभ्यागतांसाठी
आयुक्तांना निर्देश : एक पाऊल प्रतिमासंवर्धनाकडे
अमरावती : आठवड्यातील किमान दोन तास पुनर्वनियोजित भेटी व्यतिरिक्त येणाऱ्या अभ्यागतांना देण्यात यावेत, अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यगतांसाठी वेळ निश्चित करावी, असे शासनाला अपेक्षित आहे. शहर व्यवस्थापनाच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख म्हणून शहरातील नागरिक त्यांच्या समस्या, अडचणी निदर्शनास आणून देण्याकरिता महापालिका आयुक्तांना भेटू इच्छितात. तथापि त्यांना आयुक्तांची भेट मिळत नाही.अथवा त्यासाठी त्यांना वारंवार आयुक्त कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे संबंधित नागरिक शासनस्तरावर पाठपुरावा करीत असल्याचे निरीक्षण शासनाने नोंदविले आहे.
पारदर्शक व जबाबदार प्रशासनाच्या दृष्टीने ही बाब योग्य नाही. तसेच नागरिकांच्या तक्रारी समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करणे, महापालिकास्तरावर जबाबदारी पार पाडणे शासनाला अपेक्षित आहे. त्यामुळे जनमानसात महापालिकेची, पर्यायाने शासनाची प्रतिमा तयार होते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी भेटावयास येणाऱ्या नागरिकांच्या समस्येची दखल घेणे, त्यांच्यासाठी निश्चित वेळ राखून ठेवून त्यांना भेट देणे व शक्यतोवर त्यांच्या समस्यांचे निराकरण महापालिका स्तरावर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आयुक्तांना भेट सोमवारी, गुरुवारी
सोमवारी व गुरुवारी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत पूर्व परवानगीशिवाय अमरावतीच्या महापालिका आयुक्तांना भेटता येणार आहे. महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी त्यांच्या दालनासमोर नागरिकांसाठी सूचना फलक लावले आहेत. निवेदन सादर करताना पाच व्यक्तीशिवाय अधिक व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही व छायाचित्र व चित्रीकरणाचा आग्रह करु नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
प्रभावी उपाययोजनांचे निर्देश
भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांची दखल घेवून त्यांची भेट घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत राज्य शासनाने व्यक्त केले आहे. या अनुशंगाने महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या गाऱ्हाणे निराकरणाबाबत प्रभावी उपाययोजना करावी व आठवड्यातील किमान दोन तास पूर्व नियोजित भेटी व्यतिक्ति येणाऱ्या अभ्यागतांसाठी ठेवण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.