एका बेडवर दोन प्रसूता!
By Admin | Updated: May 17, 2014 23:12 IST2014-05-17T23:12:42+5:302014-05-17T23:12:42+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयात नि:शुल्क प्रसूती होत असल्याने या रूग्णालयात प्रसूतीकरिता येणार्या गोरगरीब महिला रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

एका बेडवर दोन प्रसूता!
>अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात नि:शुल्क प्रसूती होत असल्याने या रूग्णालयात प्रसूतीकरिता येणार्या गोरगरीब महिला रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे एका बेडवर दोन प्रसूत महिलांना ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी रुग्णांची गैरसोय होत आहे.
उन्हाळ्यात प्रसूतीची संख्या वाढते. त्या तुलनेत सोयी मात्र उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. जिल्हा स्त्री रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे रूग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गोरगरीब महिलांना अत्यल्प शुल्कात अद्ययावत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, स्थानिक जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाकडून महिलांना योग्य आरोग्य सेवा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
या रुग्णालयात ६ वॉर्ड असून दररोज शेकडो महिला प्रसूतीसह अन्य उपचारांकरिता दाखल होत असतात. तपासणीसाठी येणार्या महिलांना गरजेनुसार वॉर्डात दाखल करुन घेतले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रसूतीकरिता दाखल महिलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वॉर्डांमधील बेड कमी पडत आहेत. त्यामुळे एका खाटावर दोन प्रसूत महिलांना उपचार घ्यावे लागत आहे. ही अवस्था रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये पाहायला मिळाली. अन्य वॉर्डांमध्येही कमी-जास्त प्रमाणात अशीच स्थिती आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ २00 खाटांची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत महिला रूग्णांची संख्या वाढल्याने हे बेड तोकडे पडू लागले आहेत. डफरीन रूग्णालय या ना त्या कारणाने सदैव चर्चेत असते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान नवजात अर्भकांसह महिला दगावण्याचे प्रमाणही अधिक आहे. अनेकदा रूग्णांचे नातेवाईक आक्रमक होतात आणि रूग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले जातात. कित्येकदा तणावाचे वातावरण निर्माण होते. काही काळ हा प्रकार चर्चेत असतो. त्यानंतर पुन्हा स्थिती जैसे थे होते. रुग्णालयाच्या साफसफाईचा मुद्याही वारंवार चर्चेत असतो. येथील प्रसूत महिलांकडून कर्मचारी पैशांची मागणी करीत असल्याचा आरोपही रूग्णांच्या नातलगांकडून केला जातो. रुग्णालयात औषधोपचाराची सोय असूनही बाहेरून औषधी आणण्यास बाध्य केले जाते.(प्रतिनिधी)