निरीक्षणगृहातून दोन मुलींचे पलायन
By Admin | Updated: August 3, 2014 23:03 IST2014-08-03T23:03:39+5:302014-08-03T23:03:39+5:30
गाडगेनगर परिसरातील निरीक्षण गृहातील केअर टेकरच्या हातावर तुरी देऊन पलायन करणाऱ्या दोन मुलींना शनिवारी उशिरा रात्री बडनेरा व जुना बियाणी चौकातूून ताब्यात घेण्यात आले.

निरीक्षणगृहातून दोन मुलींचे पलायन
गाडगेनगरातील घटना : उशिरा रात्री मुलींना घेतले ताब्यात
अमरावती : गाडगेनगर परिसरातील निरीक्षण गृहातील केअर टेकरच्या हातावर तुरी देऊन पलायन करणाऱ्या दोन मुलींना शनिवारी उशिरा रात्री बडनेरा व जुना बियाणी चौकातूून ताब्यात घेण्यात आले.
गाडगेनगर परिसरातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृह, बालगृहात शनिवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच तपासाची सूत्रे हलवून फ्रेजरपुरा व बडनेरा रेल्वे पोलिसांनी मुलींना पकडून निरीक्षणगृहाच्या ताब्यात दिले.चंद्रपूर येथील रहिवासी दीपा (१७ बदललेले नाव) वर प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. तर नागपूर येथील रहिवासी स्नेहल (१७ बदललेले नाव) हिने बालवयात विवाह केल्याचा आरोेप आहे. त्यांना शासकीय मुलीच्या निरीक्षण बालगृहात ठेवण्यात आले होते.
नियंत्रण कक्षाची कामगिरी
शनिवारी रात्री ८.३० वाजाता निरीक्षण गृहातील मुलींनी जेवण केले.तेथील मुली आतमध्ये फेरफटका मारीत होत्या. दरम्यान निरीक्षण गृहाच्या चॅनल गेटला कुलूप नसल्याची बाब दीपा व स्नेहलच्या निदर्शनास आली. त्यांनी संधीचा फायदा घेत केअर टेकर महिलेच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती केअर टेकरला मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. रात्री उशिरा पोलिसांनी पळून गेलेल्या दोन्ही मुलींना पकडून निरीक्षकाच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
निरीक्षण गृहातून दोन मुली पळाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. ही माहिती नियंत्रण कक्षाकडून सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आली. स्नेहल ही जुना बियाणी चौकात दोन मुलांना पळून जाण्यासाठी मदत मागत होती. दरम्यान त्यातील एका मुलाने याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. कर्तव्यावर असणारे उपनिरीक्षण बळीराम राठोड व गजानन डोईफोडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फ्रेजरपुरा पोलीस व चार्ली कमांडोंना माहिती दिली.रात्री त्यांनी स्नेहलला ताब्यात घेतले. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात याची नोंद घेऊन निरीक्षणगृहात सोडले.