वीरेंद्र जगताप यांची दोन डझन पत्रे

By Admin | Updated: June 22, 2016 00:10 IST2016-06-22T00:10:29+5:302016-06-22T00:10:29+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू आमदार वीरेंद्र जगताप यांनी वाळूमाफियांनी घातलेला हैदोस, त्यामुळे रस्त्यांची होणारी हानी, महसुलाची चोरी ...

Two dozen letters of Virendra Jagtap | वीरेंद्र जगताप यांची दोन डझन पत्रे

वीरेंद्र जगताप यांची दोन डझन पत्रे

नाकर्तेपणा : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली केराची टोपली
अमरावती : काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू आमदार वीरेंद्र जगताप यांनी वाळूमाफियांनी घातलेला हैदोस, त्यामुळे रस्त्यांची होणारी हानी, महसुलाची चोरी आणि मानवी जीविताचे अपघात या गंभीर मुद्यांवर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दोन डझनाहून अधिक पत्रे पाठविली आहेत. ३० डिसेंबर २०१३ पासून सुरू झालेला हा पत्रव्यवहार अगदी १ जून २०१६ पर्यंत अव्याहत सुरू आहे. जशी यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वीरेंद्र जगतापांच्या पत्रांना केराची टोपली दाखविली तशीच जगतापांच्या तळमळीची अवमानना विद्यमान जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनीही सुरूच ठेवली.
रेतीघाटाच्या लिलावाची मुदत ३१ मेपर्यंतच ठेवावी. ज्या ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसेल तेथून रेती वाहतूक करू नये, अशा आशयाचे पत्र आ.वीरेंद्र जगताप यांनी ३० डिसेंबर २०१३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते. विशेष असे की, बोरगाव निस्ताने येथील रेती वाहतुकीसंबंधीचे हे पत्र होते. रस्त्यांची दुर्दशा होत असल्यामुळे अतिभार वाहतुकीचे रेतीचे ट्रक रोखण्याचे पत्र ५ मे २०१४ रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते.

लोकप्रतिनिधीही हतबल
अमरावती : देवगाव, तळेगाव, सुलतानपुर, नांदगाव खंडेश्वर चौफुली, बडनेरा, अमरावतीमार्गे ३० ते ४० टन रेतीची वाहतूक सुरु झाल्याने रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली. मोठ्या महसुलाची चोरी सुरु आहे. रात्री ट्रक रस्त्यांवरच उभे केले जातात. त्यांना टेललाईट नसल्याने अपघातांची संख्या वाढली, असे अवगत करणारे पत्र आमदारांनी ४ मार्च २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. या पत्रात रेतीचोरी करणाऱ्या पाच ट्रकचे क्रमांकही नमूद करण्यात आले आहेत.
महसूल, गृह आणि परिवहन हे विभाग एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करतात. अतिभार वाहतूक त्यामुळे राजरोस सुरु आहे. २ ब्रासपेक्षा अधिक रेती देणाऱ्या घाटांवरच निलंबनाची कारवाई करावी, असे पत्र १ जून २०१५ रोजी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले. या पत्रात घाटांचा उल्लेख आहे.
१०० कोटी रूपयांच्या रस्त्यांची हानी होत असल्याचे अभ्यासू पत्र जगताप यांनी २५ मे २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले. महसूल, गृह, परिवहन या विभागांनी एकत्रीतपणे अवैध रेतीवाहतुकीवर कारवाई करावी, असे सूचित केले. या पत्रात रस्ते कुण्या निधीतून आणि किती खर्च करून बांधले, याचा सविस्तर उल्लेख आहे.
आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या काही ठळक पत्रांमधील मुद्दे आम्ही लोकदरबारात सादर केले. अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या वीरेंद्र जगतापांनी २० दिवसांपूर्वीपर्यंत पत्रांचा हा सिलसिला जारीच ठेवला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या नाकर्तेपणापुढे वीरेंद्र जगतापांनाही हात टेकवावे लागले.
यवतमाळ कलेक्टरकरवी दखल
वीरेंद्र जगतापांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही १ जून २०१५ रोजी पत्र लिहिले होते. त्यांनी या संबंधीची दखल घेऊन कळंब आणि बाभुळगाव येथील तहसीलदारांना २४ जून २०१५ रोजी २ ब्रासपेक्षा अधिक रेती वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश लेखी स्वरुपात दिले होते.

Web Title: Two dozen letters of Virendra Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.