‘दरदिवशी दोन कोटींचे लक्ष्य
By Admin | Updated: March 26, 2017 00:07 IST2017-03-26T00:07:53+5:302017-03-26T00:07:53+5:30
चालू आर्थिक वर्ष संपायला उणेपुरा आठवडा शिल्लक असताना करवसुली माघारल्याने आयुक्त चिंतातूर झाले आहेत.

‘दरदिवशी दोन कोटींचे लक्ष्य
कर विभाग माघारला : ४१ कोटींची मागणी, २७ कोटी प्राप्त
अमरावती : चालू आर्थिक वर्ष संपायला उणेपुरा आठवडा शिल्लक असताना करवसुली माघारल्याने आयुक्त चिंतातूर झाले आहेत. विशेष वसुली शिबिराला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने व बडे थकबाकीदार जुमानत नसल्याने वसुली २७ कोटींवर स्थिरावली आहे. सुटीच्या दिवशीही विशेष वसुली शिबिर घेतले जात असून प्रशासनाने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची शनिवारची शासकीय सुटी रद्द केली आहे.
सोमवारपासून सुरू होत असलेल्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित १४ कोटी रुपये वसुलीचे आव्हान सहायक आयुक्तांसह करसंकलन अधिकाऱ्यांना पेलायचे आहे. १०० टक्के वसुलीसाठी महापालिकेला आता दरदिवशी २ कोटींच्यावर मालमत्ता कर वसूल करावा लागेल. महापालिकेचा कर विभाग अधिनिस्थ यंत्रणा आणि नागरिकांच्या सहकार्यातून मालमत्ता कराच्या थकबाकीचा एव्हरेस्ट पेलतो काय, हे ३१ मार्चअखेर स्पष्ट होईल.
गतवर्षीच्या ३२ कोटींच्या आकड्यापर्यंत जाण्यासाठी पालिकेला ५ कोटींची गरज असून त्यासाठी दररोज एक कोटी तर १०० टक्के वसुलीसाठी दररोज २ कोटींच्या वसुलीचे आव्हान कर लिपिकांना पेलायचे आहे. १ एप्रिल २०१६ ते २४ मार्च २०१७ या कालावधीत २६ कोटी ५१ लाख २८ हजार ८९६ रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे.
वर्षोनुवर्षे तेच ते कर्मचारी कर विभाग आणि झोन कार्यालयात कार्यरत असल्याने करवसुलीत भ्रष्टाचार बोकाळला आहे. ५० हजारांहून अधिक मालमत्तांना कर लागलेला नाही. परस्परच अशी प्रकरणे निपटविण्यावर भर दिला जात असल्याने टॅक्स चोरी करणाऱ्यांचे फावले आहे. शहरात दीड लाखाहून अधिक भाडेकरू राहत असताना करलिपिकांच्या नजरेतून ती बाब सुटतेच कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, अधिक कर लावण्याची तंबी देत अशा घरमालकांकडून वर्षाकाठी वा महिन्याकाठी मोठी रक्कम अवैधपणे वसूल केली जाते. त्यावर कोणत्याच अधिकाऱ्यांचे कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही. यासोबतच शासकीय संस्था, उद्योग, शिक्षणसंस्था, एसआरपीएफसारखे बडे थकबाकीदार महापालिकेला जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)
मालमत्ता कराच्या १०० टक्के वसुलीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ४१.५९ कोटी रुपये मागणीच्या तुलनेत २४ मार्चपर्यंत २६.५१ कोटी रुपये महसूल गोळा झाला आहे.
- महेश देशमुख, कर व मूल्यनिर्धारण अधिकारी, महापालिका