अमरावतीत दोन कोरोना लॅब, उद्या पोहोचणार यंत्रसामग्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:59+5:30
कोरानासंबंधी नमुने तपासण्यासाठी नागपूरला चार प्रयोगशाळा आहेत. अमरावती हे विभागीय मुख्यालय आहे; मात्र येथे एकही प्रयोगशाळा नाही. दोन प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

अमरावतीत दोन कोरोना लॅब, उद्या पोहोचणार यंत्रसामग्री
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती शहरात लवकरच दोन कोराना लेबॉरेटरीज् कार्यान्वित होणार असून, त्यासाठी डीपीसीतून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सोमवारी दिली. या प्रयोगशाळांमुळे कोरोना संशयितांच्या नमुन्यांची विनाविलंब तपासणी होणार आहे.
कोरानासंबंधी नमुने तपासण्यासाठी नागपूरला चार प्रयोगशाळा आहेत. अमरावती हे विभागीय मुख्यालय आहे; मात्र येथे एकही प्रयोगशाळा नाही. दोन प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. शासनस्तरावर हिरवी झेंडी मिळाल्यावर त्यांनी प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाला केल्या. तसे प्रस्तावही आलेत. नामदार ठाकूर यांनी त्यावर तातडीने कार्यवाही आरंभली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सदर प्रयोगशाळा सुरू होणार आहेत. उद्या किंवा परवा आवश्यक यंत्रसामग्रीची पूर्तता केली जाईल. केंद्राच्या आयसीएमआर प्राधिकरणाद्वारे आॅनलाइन चाचणी करण्यात आल्यानंतर या प्रयोगशाळांमध्ये कोरोनासंबंधी चाचण्या सुरू होतील. अन्य संसर्गजन्य आजारांच्याही चाचण्या तेथे करता येतील. वर्षभर या प्रयोगशाळांचा उपयोग करता येईल.
नियोजन समितीतून निधी
पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन्ही प्रयोगशाळांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तसे निर्देश त्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले आहेत. यासंदर्भात नामदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी सोमवारी चर्चा केली. अमरावती विभागातील कोरोनाच्या चाचण्यांसाठीचे थ्रोट स्वॅब नागपूरच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत असल्याने अहवाल उशिरा प्राप्त होत आहेत. अमरावतीमध्ये दोन प्रयोगशाळा स्थापन झाल्यानंतर ही अडचण दूर होणार आहे.
कोरानासंबंधी नमुने तपासण्यासाठी अमरावतीत दोन प्रयोगशाळा असाव्याच, अशी भूमिका मांडली. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आरोग्यमंत्रीही अनुकूल होते. डीपीसीतून मी निधी उपलब्ध करून दिला. एक-दोन दिवसात लॅब सुरू होतील.
- यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती.