दोन समुदायांत मारहाण, २ गंभीर,१४ जखमी
By Admin | Updated: October 25, 2014 22:32 IST2014-10-25T22:32:36+5:302014-10-25T22:32:36+5:30
दोन समुदायांमधील अपंग मुलांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादाने उग्ररूप धारण केल्यामुळे नजीकच्या भंडारज येथे दंगल उसळली. दोन्ही समुदायांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व काठ्यांनी हल्ला चढविला.

दोन समुदायांत मारहाण, २ गंभीर,१४ जखमी
लहान मुलांचा वाद विकोपाला : भंडारज येथील घटना, २४ आरोपींना अटक
अंजनगाव (सुर्जी) : दोन समुदायांमधील अपंग मुलांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादाने उग्ररूप धारण केल्यामुळे नजीकच्या भंडारज येथे दंगल उसळली. दोन्ही समुदायांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व काठ्यांनी हल्ला चढविला. यात दोन्ही गटांमधील १४ जण जखमी झाले असून गंभीर जखमी अवस्थेतील एकाला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही समुदायांच्या २४ आरोपींना अटक केली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
अंजनगाव-अकोट रस्त्यावर १२ किलोमीटर अंतरावर भंडारज हे गाव आहे. येथील धनवाडी येथे दुपारी दोन विशिष्ट समुदायांमधील अपंग मुलांचा आपसात वाद झाला होता. याबाबत दुसऱ्या समुदायाची समजूत काढण्यासाठी एका समुदायाचे काही लोक त्यांच्या वस्तीत रात्री ८ च्या सुमारास गेले असता वाद संपुष्टात येण्याऐवजी अधिकच विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही समुदायांतील लोकांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व काठ्यांनी हल्ला चढविला. यावेळी एकमेकांवर दगड-विटांचा हल्लासुध्दा करण्यात आला.
या घटनेत दोन्ही समुदायातील चौदा जण जखमी झाले. त्यामध्ये अ. एजाज अ. रहिम, अ. ईशाक अ. रहिम, अ. इम्रान अ.कदिर, अ.आरिफ अ. रहिम, अ. रहिम अ. जब्बार, सुभाष राक्षसकर, रमेश राक्षसकर, विशाल राक्षसकर, विनोद राक्षसकर, धम्मराज राक्षसकर, नागेश राक्षसकर, दिनकर राक्षसकर, विकास राक्षसकर यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रथम अंजनगाव ग्रामीण रूग्णालयात व नंतर परतवाडा व अमरावती येथे हलविण्यात आले. प्रदीप दिनकर राक्षसकर याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. तर अब्दुल इरफान अ.करीम, अब्दुल एहजाज अ. रहीम, अब्दुल आसिफ अ. रहीम, अ. रहिम अब्दुल जब्बार या जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी अ. रहिम अ. जब्बार (६०) यांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच अंजनगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन पडघन, उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे, अनिल कविटकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तातडीने कारवाई करून दंगलखोरांना अटक करण्यात आली. पोलीस वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेनंतर दोन्ही समुदायांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या हाणामारीत जखमी झालेल्या इसमांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून एकाला नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे.