स्वास्थ्य निरीक्षकासह दोन बिटप्युनवर फौजदारी!
By Admin | Updated: September 6, 2015 00:13 IST2015-09-06T00:13:47+5:302015-09-06T00:13:47+5:30
साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा, सफाई कंत्राटदाराशी असलेले लागेबांधे याप्रकरणी किरणनगर प्रभाग क्र. ३४ येथे कार्यरत दोन बिटप्युन (जमादार) व एका आरोग्य ...

स्वास्थ्य निरीक्षकासह दोन बिटप्युनवर फौजदारी!
आयुक्तांचा निर्णय : कारवाईचे फाईल आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात
अमरावती : साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा, सफाई कंत्राटदाराशी असलेले लागेबांधे याप्रकरणी किरणनगर प्रभाग क्र. ३४ येथे कार्यरत दोन बिटप्युन (जमादार) व एका आरोग्य निरीक्षकावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या कारवाईबाबतचे फाईल आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात असून पुढील आठवड्यात हे प्रकरण पोलिसांत दिले जाणार आहे.
महानगरातील ४३ प्रभागांतील दैनंदिन साफसफाईची जबाबदारी कंत्राटी पध्दतीने देण्यात आली आहे. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायुक्त, आरोग्य अधिकारी, आरोग्य अधीक्षक, स्वच्छता विभागप्रमुख, आरोग्य निरीक्षक व बिटप्युन अशी साखळी नेमण्यात आली आहे. परंतु साखळीला छेद देऊन दैनंदिन सफाईच्या कामात अनियमितता, अपहाराची अनेक प्रकरणे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी उघडकीस आणली आहेत. मध्यंतरी त्यांनी प्रभागनिहाय धाडसत्र राबवून सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरीबुक तपासले होते. यात उणिवा आढळल्याने संबंधित सफाई कंत्राटदारावर कारवाईसुध्दा केली होती. याच श्रुंखलेत किरणनगर येथील सफाई कंत्राटात मोठी अनियमितता असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली होती. त्याअनुषंगाने सहायक आरोग्य अधिकारी अजय जाधव यांनी गेल्या आठवड्यात या प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरीबुक तपासले असता बरीच तफावत आढळून आली. सलग तीन दिवस सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरीबुक भरण्यात आले नव्हते.