बिबटासह दोन छाव्यांनी केली वासराची शिकार
By Admin | Updated: June 13, 2017 00:03 IST2017-06-13T00:03:45+5:302017-06-13T00:03:45+5:30
रविवारी मध्यरात्री गोठ्यातील गार्इंच्या आक्रोशाने चौकीदाराची झोप उडाली.

बिबटासह दोन छाव्यांनी केली वासराची शिकार
वडद येथील घटना : वनविभागाकडून पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रविवारी मध्यरात्री गोठ्यातील गार्इंच्या आक्रोशाने चौकीदाराची झोप उडाली. त्याने गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट वासरूची शिकार करताना आढळून आला. चौकीदाराने आरडाओरड केल्यानंतर बिबट्यासह दोन छाव्यांनी तेथून पलायन केले. ही घटना कोंडेश्वर मार्गावरील वडद गावाजवळील शेतशिवारात घडली.
सोमवारी सकाळी बडनेरा बिटच्या वनरक्षक अलका मंजुळकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जिल्हा परिषद पशु वैद्यकीय अधिकारी राजेंंद्र इंगळे यांनी मृत वासराचे शवविच्छेदन केले. गोठा व शेतशिवारात बिबटासह २ छाव्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. वडद गावालगतच मोहन सूर्यभान दारोकार यांच्या शेतात पोट्री फार्म असून दोन गाई एका वासरासाठी गोठा तयार आहे. रविवारी चौकीदार बाबाराव शिनपुरे हे जेवण करून झोपले असता मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास गाईच्या हंबरडण्याचा आवाज आल्याने बाबाराव खडबडून जागे झाले. गोठ्याकडे बघितले असता त्यांना बिबट पळताना आढळला. बिबट पळून गेल्याचे पाहून त्यांना धिर आला. त्यांनी या घटनेची माहिती मोहन दारोकार यांना दिली. त्यांच्या माहितीच्या आधारे सोमवारी वनविभागाला माहिती कळविण्यात आली.