देशी कट्ट्यासह अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त
By Admin | Updated: May 18, 2014 23:11 IST2014-05-18T23:11:55+5:302014-05-18T23:11:55+5:30
व्यवहारात चलनासाठी आणलेल्या अडीच लाखांच्या बनावट नोटा, देशी कट्टा व सात जिवंत काडतूस जप्त करुन चार जणांना पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी पोस्ट मास्तर आहे.

देशी कट्ट्यासह अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त
चार आरोपी अटकेत : अमरावती जिल्ह्यात बनावट नोटांचा काळाबाजार
अमरावती : व्यवहारात चलनासाठी आणलेल्या अडीच लाखांच्या बनावट नोटा, देशी कट्टा व सात जिवंत काडतूस जप्त करुन चार जणांना पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी पोस्ट मास्तर आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ग्रामीण पथकाने शनिवारी दिवसभर केली. आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात बनावट नोटांचा काळाबाजार करणार्या आरोपींमध्ये श्रीकृ ष्ण पांडुरंग रायबोले (५६, रा. आनंदनगर, दर्यापूर), सचिन केशव शंकरपुरे (रा.तोंगलाबाद, दर्यापूर, ह. मु. सिंधी कॅम्प, कारंजा लाड), राजा ऊर्फ मोहम्मद राहील मो. शफी (२८, रा.चौधरी मैदान, चावलमंडी, अचलपूर), शेख मुन्नू शेख सलिम (रा. गवळीपुरा) या चौघांचा समावेश आहे. श्रीकृष्ण रायबोले हा नकली नोटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. बनावट नोटांचे अमरावतीत कनेक्शन आरोपी राजा ऊर्फ मो.राहील याला पोलिसांनी अमरावतीच्या बसस्थानकातून अटक केली. त्याने बनावट नोटा अमरावती शहरातून वसीम चायना व शेख मुन्नू याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी राजाच्या माध्यमातून वसीम व शेख मुन्नू याला भेटण्यासाठी बोलाविले. दोघांनी गाडगेनगरमध्ये भेटायला येत असल्याचे राजाला सांगितले. परंतु वसीमने ऐनवेळी प्लान बदलविला व पीडीएमसी समोरचे स्थळ निश्चित केले. तेथे पोलिसांनी सापळा रचल्याचे लक्षात येताच वसीमने तेथून पोबारा केला. मात्र, शेख मुन्नुला पकडण्यात पोेलिसांना यश आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे मॅग्झीन असलेले पिस्टल व त्यातील ७.६५ एम. एम चे ७ जिवंत काडतूस जप्त केले. पोस्ट मास्तरकडून ५० हजारांच्या नोटा जप्त श्रीकृष्ण रायबोले हा पूर्वी होमगार्ड होता. त्याने कारंजा लाड येथे पोस्ट मास्तर असलेला त्याचा साथीदार सचिन शंकरपुरे याला ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दिल्या होत्या. परंतु या नोटा चलनात न आल्याने तो नोटा घेऊन परतत असल्याची माहिती श्रीकृष्णने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सचिनलाही अटक केली व त्याच्याकडून ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.