लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुक्कुटपालन व्यवसाय उभा करत कोट्यवधींचा टर्नओव्हर गाठणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आता थेट ऑक्सफर्ड विद्यापीठात आपले अनुभव मांडण्याचे निमंत्रण मिळाले आहे. अमरावती जिल्ह्यातील म्हसाळा अंजनगाव बारी येथील रवींद्र माणिकराव मेटकर असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.
मेटकर हे १ ते ५ मे दरम्यान होणाऱ्या ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्समध्ये कृषी उद्योजक म्हणून 'एआय फॉर एव्हरी माइंड' या संकल्पनेवर मार्गदर्शन करणार आहेत. ही परिषद ग्लोबल इकॉनॉमिक फोरम (GEF) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे. आपला कुक्कुटपालन व्यवसाय वाढवण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यावर त्यांनी भर दिला असून आतापर्यंत देश-विदेशातील विविध कृषी संस्थांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत. कुक्कुटपालनासोबतच ते केळी, आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू, नारळ तसेच गहू व मका पिकांची शेती करतात. सेंद्रिय खतांचा वापर आणि नवकल्पक पद्धतींमुळे कमी खर्चात अधिक नफा मिळत असल्याचे ते सांगतात.
१०० कोंबड्यांपासून व्यवसायाची सुरवात
- मेटकर यांनी १९८४ साली कॉलेजमध्ये शिकत असतानाच घराच्या टेरेसवर केवळ ३ हजार रुपयांत आणि १०० कोंबड्यांपासून कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात केली. त्यांचे वडील वन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते.
- एम.कॉम. पूर्ण केल्यानंतर कुटुंबाला मिळालेली चार एकर जमीन विकून बडनेरा येथे एक २ एकर जमीन घेतली. त्यानंतर ५ लाखांचे कर्ज घेऊन ४ हजार कोंबड्यांचा प्रकल्प सुरू केला.
- २००६ पर्यंत हा व्यवसाय १० एकरावर २० हजार कोंबड्यांपर्यंत वाढला. बर्ड फ्लूचा मोठा फटका बसून व्यवसाय ठप्प झाला. तरीही त्यांनी हार न मानता २००८ मध्ये २५ लाखांचे कर्ज घेऊन नव्याने सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी सुमारे १० हजार कोंबड्यांची भर पडत गेली.
- सध्या त्यांच्या ५० एकर परिसरात १ लाख ८० हजार कोंबड्या असून वार्षिक उलाढाल सुमारे १५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे आता त्यांच्यावर कोणतेही बँक कर्ज नाही.
"एकेकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी माझ्याकडे सायकल नव्हती, फाटके कपडे शिवून वापरायचो. आज चक्क ऑक्सफर्ड विद्यापीठात निमंत्रण मिळालं, यावर माझा विश्वास बसत नाहीये. हा कष्ट करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा सन्मान आहे."- रवींद्र मेटकर, शेतकरी उद्योजक
Web Summary : Amravati's Ravindra Metkar, a poultry farmer with a multi-crore turnover, is invited to Oxford University. Starting with 100 hens, he now manages 180,000, demonstrating innovative, low-cost farming. He will speak at Global Research Conference on AI in agriculture.
Web Summary : अमरावती के रवींद्र मेटकर, एक कुक्कुट किसान, जिनका करोड़ों का कारोबार है, को ऑक्सफोर्ड विश्वविद्यालय में आमंत्रित किया गया है। 100 मुर्गियों से शुरुआत करके, अब वे 180,000 का प्रबंधन करते हैं, जो नवीन, कम लागत वाली खेती का प्रदर्शन करते हैं। वे कृषि में एआई पर ग्लोबल रिसर्च कॉन्फ्रेंस में बोलेंगे।