तुपाच्या थेंबांमुळे झाला तूपचोराचा उलगडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:03+5:302021-03-10T04:14:03+5:30
अनिल कडू परतवाडा : चोरलेल्या तुपाच्या डब्यातील रस्त्याने सांडत गेलेल्या तुपाच्या थेंबामुळे तूपचारोचा उलगडा झाला असून, अगदी त्याच्या घरापर्यंत ...

तुपाच्या थेंबांमुळे झाला तूपचोराचा उलगडा !
अनिल कडू
परतवाडा : चोरलेल्या तुपाच्या डब्यातील रस्त्याने सांडत गेलेल्या तुपाच्या थेंबामुळे तूपचारोचा उलगडा झाला असून, अगदी त्याच्या घरापर्यंत संबंधितांना पोहोचता आले.
परतवाडा शहरातील अगदी मध्यवस्तीत ही तुपाची चोरी झाली. या तुपाच्या डब्यासोबतच चोरट्याने गव्हाचे पोते आणि घरातील दोन हजार रुपये रोख नगदी पळविले. ही घटना रविवार ७ मार्च रोजी पुढे आली. या चोरीची माहिती रविवारी पोलिसांच्या कानी टाकल्या गेली. पण, वृत्त लिहिस्तोवर या घटनेची कुणीही पोलिसांत तक्रार दिली नाही. ज्यांच्याकडे चोरी झाली ते बाहेरगावी गेले आहेत. घराची चावी त्यांनी शेजाऱ्याकडे दिली. शेजाऱ्यांनी आदल्या दिवशी घर उघडून अंगणात पाणी टाकले. रविवारी परत शेजाऱ्यांनी घर उघडण्याचा प्रयत्न केला असता, घराचा दरवाजा आतून बंद होता. मागच्या बाजूने बघितले, तर शिडी लागली होती. शिडीवरून आत प्रवेश केला असता, घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले. तुपाचा एक पिंप व गव्हाचे पोते गायब दिसले.
शिडीवरुन तुपाचा पिंप पळवताना त्या चोराच्या हातून तो सटकला. यात काही तूप तेथेच सांडले. नंतर त्या तुपाच्या थेंबांची धार भोईपुऱ्यापर्यंत गेल्याचे लक्षात आले. चौकशी अंती संबंधितांना संशयित चोर कोण व ते तूप कोणी विकले, याची माहिती मिळाली. ही माहिती संबंधितांनी पोलिसांपर्यंत पोहचवली, पण तक्रार दिली नाही.
बॉक्स
संशयित चोर गंभीर जखमी
संबंधितांना तूपचोरी आणि चमच्याने तूप विकल्याची माहिती मिळाली. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास स्थानिक आठवडी बाजारात गंभीर जखमी अवस्थेत तो चोर पोलिसांना आढळून आला. रविवारी आठवडी बाजारात दारू पित बसला असताना, या संशयित ३१ वर्षीय युवकावर अज्ञात इसमाने दगडाने प्राणघातक हमला चढविला. गंभीर अवस्थेत पोलिसांनी त्यास अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला उपचारार्थ अमरावतीला हलविले गेले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेच्या अनुषंगाने त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
--------