मंगळवारच्या पावसाने पेरणीत ५ टक्के वाढ
By Admin | Updated: July 16, 2014 23:49 IST2014-07-16T23:49:09+5:302014-07-16T23:49:09+5:30
मान्सून लांबल्यामुळे ७ जून ते १० जुलैपर्यंत म्हणजे फक्त तीन दिवस पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्हाभरात केवळ १०.६१ टक्के पेरण्या आटोपल्या. त्यानंतर १५ जुलै रोजी पावसाच्या दमदार

मंगळवारच्या पावसाने पेरणीत ५ टक्के वाढ
सरासरी पेरणी १५ टक्के : पेरणीची लगबग सुरु, पावसासाठी बळीराजा आसुसलेलाच, तिवसा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
अमरावती : मान्सून लांबल्यामुळे ७ जून ते १० जुलैपर्यंत म्हणजे फक्त तीन दिवस पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्हाभरात केवळ १०.६१ टक्के पेरण्या आटोपल्या. त्यानंतर १५ जुलै रोजी पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकरी सुखावला. बुधवारपासून जिल्ह्यात पेरणीला सुरूवात झाली आहे. एक दिवसात जिल्ह्यात सरासरी ५ टक्के पेरण्या आटोपल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरीप हंगामात दरवर्षी ७ जूनपासून मृगाचा पाऊस पडतो. तेव्हापासूनच शेतकरी पेरणीच्या कामाला लागतात. मात्र, यंदा पावसाने तब्बल दीड महिना दडी मारल्याने जिल्ह्यातील खरिपाची पेरणी रखडली आहे. यंदा खरीप हंगामातील मूग, उडीद या पिकांच्या लागवडीचा कालावधी निघून गेला.
२६ जुलैपर्यंत आटोपणार पेरण्या
१५ जुलै रोजीच्या दमदार पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैपर्यंत जिल्ह्यात खरीपाच्या ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची पेरणी झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली.
मंगळवारी जोरदार पाऊस पडताच शेतकरी सुखावला. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात झाली नाही. खरीपातील तीन पिकांच्या पेरणीचा हंगाम निघून गेला असला तरी ३० जुलै अखेरपर्यंत कपाशी पिकाशिवाय पर्याय खरीपात लागवडीसाठी मिळू शकणार नाही. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या दडीमुळे पेरणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात ब्रेक बसला आहे. साधारणत: २६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बुधवारपर्यंत जिल्ह्यात साधारणत: १५ टक्के पेरण्या आटोपल्याचा अंदाजही कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पेरणीच्या अधिक टक्केवारीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार असल्याने त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी स्पष्ट होणार आहे. आणखी दोन दिवस सलग पाऊस आल्यास शेती पिकासाठी लाभदायक ठरणार आहे.
जिल्ह्यात ३९.९ मि.मी.पाऊस
गेल्या २४ तासांत अमरावती जिल्ह्यात दमदार पर्ज्यन्यवृष्टी झाली. विविध तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात सर्वाधिक ७१.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
यंदा खरिपातील पेरण्यांचा खरा मुहूर्त पावसाच्या लहरीपणामुळे निघून गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांना मूग, उडीद ही पिके पेरणीतून बाद करावी लागली. त्यापाठोपाठ आता ज्वारी व सोयाबीनचेही क्षेत्र पावसाच्या लहरीपणामुळे घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १५ जुलैपर्यंत महसूल विभागाची आणेवारी काढून त्याआधारे जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.