अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट
By Admin | Updated: August 6, 2016 00:11 IST2016-08-06T00:11:01+5:302016-08-06T00:11:01+5:30
यावर्षीच्या पहिल्याच हंगामात अतिवृष्टीमुळे तूर उत्पादकांना चांगला फटका बसला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट
१५ गावांना फटका : शेतकऱ्यांची झाली निराशा
टाकरखेडा संभू : यावर्षीच्या पहिल्याच हंगामात अतिवृष्टीमुळे तूर उत्पादकांना चांगला फटका बसला आहे. टाकरखेडा संभू परिसरात साऊर, कळमगव्हाण, रामा, आष्टी, देवरी, जळका हिरापूर, मार्की मक्रमपूर, वायगाव, कामनापूर, जावरा, चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर, कृष्णापूर, तळवेल, जवळा शहापूर आदी गावांमध्ये काही शेतकऱ्यांना दोन महिन्यांत दोन ते तीन वेळा तुरीची पेरणी करावी लागली. परंतु तेही हाती लागले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी पेरणीयोग्य पाऊस येणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु ओल्या दुष्काळाने निराशा केली. पहिल्या पावसात जूनमध्ये ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्यापूर्ण केल्यात. परंतु त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे बियाणे जळाले. त्यानंतर लगेच काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या केल्या आहेत. परंतु त्याही हाती लागल्या नाही. जेमतेम पीक निघाले होते. त्यावर पाण्याचे तळे साचल्याने तेही जळून गेले. पावसाचा अंदाज घेऊन एक संधी देण्याचे शेतकऱ्याने पुन्हा धाडस करून तुरीची पेरणी केली. परंतु सततच्या पावसामुळे त्याचाही बीमोड झाला.
या परिसरातील काही शेतकऱ्यांना दुबार, तर काहींना तिबार पेरणी करावी लागली. मागील तीन वर्षांपासून नापिकाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांवर आधीच कर्जाचा डोंगर असताना या नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, या आशेवर शेतकरी आहे. याच बरोबर उडीद, मूग, सोयाबीनच्या उत्पादकांनादेखील या अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला. याचे सर्वाधिक नुकसान भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू, साऊर, कळमगव्हाण, रामा, आष्टी, देवरी, जळका हिरापूर, मार्की मक्रमपूर, वायगाव, कामनापूर, जावरा, चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर, कृष्णापूर, तळवेल, जवळा शहापूर आदी गावांमध्य आहे. (वार्ताहर)