लोकसहभागातून हरित, स्वच्छ, सुंदर शहर करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST2020-12-30T04:18:14+5:302020-12-30T04:18:14+5:30
अमरावती : महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व गार्डन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ, सुंदर आणि हरित अमरावतीचे स्वप्न ...

लोकसहभागातून हरित, स्वच्छ, सुंदर शहर करण्याचा प्रयत्न
अमरावती : महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व गार्डन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ, सुंदर आणि हरित अमरावतीचे स्वप्न साकारण्यासाठी वृक्ष पालकत्व अभियानाची संकल्पना मांडण्यात आली आहे. या अभियानाचा १७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता रिंग रोड चौकातून प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुलभा खोडके यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
शहरातील मुख्य रस्त्यांचे सौंदर्यीकरण तसेच वृक्षलागवडीच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली आहे. गार्डन क्लबच्या तज्ज्ञ मार्गदर्शनातून शहराच्या विविध रस्त्यांवर दोन्ही बाजूला वृक्ष आणि डिव्हायडरमध्ये विविध फुलझाडांची लागवड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. लागवड केल्यानंतर तण निर्मूलन, झाडांचे पोषण आणि पाण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली जात नाही. त्यामुळे अशा उपक्रमांतील मनुष्यबळ, पैसा आणि प्रयत्न व्यर्थ जातात आणि परिणामी जनतेत प्रचंड नाराजी निर्माण होते. लोकसहभागातून या अडचणीवर प्रभावीरीत्या मात करून शहराच्या विकासात प्रत्येक परिवाराचा सहभाग व्हावा, असे आवाहान आमदार खोडके यांनी अमरावतीकरांना वृक्ष पालकत्व अभियानाच्या माध्यमातून केले.
महापालिका आयुक्त प्रशांत रोड़े, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, उपअभियंता एच.झेड. काझी, एन.आर. देशमुख, सहायक अभियंता विनोद बोरसे, श्रीकृष्ण गोमकाळे, महापालिका उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, यश खोडके, गार्डन क्लब अध्यक्ष दिनेश खेडकर, उपाध्यक्ष सुभाष भावे, सचिव रेखा मग्गीरवार, गणेश हेडावू, सदस्य व्ही.आर. देशमुख पत्रपरिषदेला उपस्थित होते.