गणपतीसाठी फुले तोडली म्हणून गळा दाबून मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2016 00:07 IST2016-09-15T00:07:54+5:302016-09-15T00:07:54+5:30
शिकवणी वर्गासाठी गेलेल्या बालकाने गणपतीच्या पूजेसाठी एका घराच्या आवारातील फुले तोडली.

गणपतीसाठी फुले तोडली म्हणून गळा दाबून मारण्याचा प्रयत्न
तक्रार दाखल : चिमुरड्याला बेदम मारहाण, आरोपी पसार
अमरावती : शिकवणी वर्गासाठी गेलेल्या बालकाने गणपतीच्या पूजेसाठी एका घराच्या आवारातील फुले तोडली. ही बाब घरमालकाच्या लक्षात येताच त्याने बालकाचा पाठलाग करून त्याला पकडले आणि बेदम मारहाण करीत गळा दाबून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगरात घडली. पोलिसांनी त्या निर्दयी इसमाचा शोध सुरु केल्यानंतर तो पसार झाला आहे.
रहाटगाव येथील रहिवासी आशा गिरी यांच्या घरात भाड्याने राहणारा ईश्वर सुनील ढवळी (१३) हा दररोज रामनगर परिसरात शिकवणीकरीता जातो. १२ सप्टेंबर रोजी तो त्याच्या काही मित्रांसोबत शिकवणीला गेला होता. घरी परतताना तो वाटेत दिसणारी फुले गणपतीसाठी गोळा करीत होता. एका घराच्या आवारातील काही फुले त्याने तोडली. दरम्यान त्याचा पाठलाग करणाऱ्या ॅइसमाने त्याला मार्गातच गाठले. त्याने ईश्वरला शिवीगाळ सुरू केल्याने त्याचे अन्य मित्र पळून गेले. ईश्वर मात्र त्याच्या तावडीत सापडला. घराच्या आवारातील फुले तोडली म्हणून संतापलेल्या त्या व्यक्तिने ईश्वरला बेदम मारहाण करीत गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीमुळे व गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याने ईश्वर अस्वस्थ झाला होता. ईश्वरला मारहाण सुरु असल्याने काही वेळ तेथे बघ्यांची गर्दी जमली होती. चिमुरडयाला मारहाण करताना पाहून अनेकांनी त्या इसमाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मारहाण करणे सुरूच ठेवले. काही वेळात शेकडो नागरिक घटनास्थळी जमले आणि त्यांनी ईश्वरला त्या इसमाच्या तावडीतून सोडविले. अत्यंत घाबरलेल्या व अस्वस्थ झालेल्या ईश्वरवर प्रथमोपचार करून बघ्यांपैकी काहींनी त्याला त्याच्या घरी नेऊन सोडले.
या घटनेची तक्रार ईश्वरचे वडिल सुनील ढवळी यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात केली आहे. ईश्वर मारहाण करणाऱ्या इसमाला चेहऱ्यानिशी ओळखतो. त्या अज्ञात इसमाच्या घराची ओळख ईश्वरने पटवून दिली असून मात्र, ईश्वरला मारहाण करणारा त्या घरातील ईसम मात्र अद्याप फरार असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.