तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न; वाळू चोरट्याचा प्रताप
By Admin | Updated: December 21, 2015 00:14 IST2015-12-21T00:14:41+5:302015-12-21T00:14:41+5:30
वाळुची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर वाहून नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न; वाळू चोरट्याचा प्रताप
अमरावती : वाळुची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर वाहून नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. १९ डिसेंबरला सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी वाहनचालक मंगेश सुभाष सनके (हरताळा) याचेविरुद्ध कलम ३०७, ३५३, २७९, ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. भातकुलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांच्यावर हा जीवघेणा प्रसंग उद्भवला.
पाच महिन्यांपूर्वी अमरावतीच्या तहसीलदारांच्या अंगावर वाहन नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर वाळू तस्कर आणि चोरट्यांविरुध्द मोहिमेला गती आली होती, हे उल्लेखनीय. भातकुली तालुक्यातील हरताळा नाल्यातून काहीजण वाळुची चोरी आणि अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार अजितकुमार येळे हे त्यांच्या पथकासह शनिवारी सायंकाळी हरतोटी फाट्यावर पोहोचले. त्यावेळी चारचाकी वाहनातून वाळुची चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येळे यांनी त्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने अंगावर वाहन घातले.