उमेदवारांच्या सेवेसाठी आता ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST2021-01-24T04:06:05+5:302021-01-24T04:06:05+5:30

अमरावती: ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

'True Voter App' now for candidate service | उमेदवारांच्या सेवेसाठी आता ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’

उमेदवारांच्या सेवेसाठी आता ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’

अमरावती: ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्चही करण्यात आला. हा खर्च आता उमेदवारांना सादर करावा लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल अ‍ॅप’द्वारे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते. त्यादृष्टीने उमेदवारांच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मोबाईल अ‍ॅपद्वारे खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे. परंतु, याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक खर्च सादर करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना केली होती. त्यादृष्टीन निवडणूक आयोगाने उपयुक्त असे ट्रू व्होटर मोबाईल अ‍ॅप उपलब्ध केले आहे.

बॉक्स

अनेक प्रकारच्या सुविधा

२०१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ॲपचा वापर करण्यात येत आहे. यात निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्यासोबतच मतदार यादीतील नाव शोधणे, मतदान केंद्राचे ठिकाण शोधणे, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती जाणून घेणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणुकांशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मतदार यादी बनविणे, मतदान केंद्राचा नकाशा तयार करणे, महत्त्वाचे अहवाल सादर करणे, मतदानाची आकडेवारी देणे आदी सुविधा आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका लढविलेल्या जिल्ह्यात व राज्यभरातील हजारो मतदारांनी हे याप डाउनलोड केले आहे.

Web Title: 'True Voter App' now for candidate service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.