ट्रकने सायकलस्वाराला चिरडले
By Admin | Updated: October 11, 2016 00:08 IST2016-10-11T00:08:47+5:302016-10-11T00:08:47+5:30
सिंलिडरच्या ट्रकखाली चिरडून सायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ट्रकने सायकलस्वाराला चिरडले
मर्च्युरी टी पॉर्इंटवरील घटना : ट्रकचालक पसार, वाहतूक विस्कळीत
अमरावती : सिंलिडरच्या ट्रकखाली चिरडून सायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मर्च्युरी टी-पॉर्इंटवर सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली. संतोष मोहिते (३७,रा. कारंजा लाड, ह.मु.विलासनगर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
इर्विननजीकचा मर्च्युरी टी-पॉर्इंट अपघात प्रवणस्थळ बनले असून आतापर्यंतच्या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. सिंलिडरने भरलेला ट्रक क्रमांक एम.एच. २७-एक्स.-५६९३ इर्विनकडून जयस्तंभ चौकाकडे भरधाव जात होता. दरम्यान सायकलस्वार संतोष मोहिते हा ट्रकच्या मागच्या चाकात येऊन चिरडला गेला. ट्रक संतोष मोहिते यांच्या डोक्यावरून गेल्याने घटनास्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. वर्दळीच्या मार्गावर अपघात घडल्याने वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. तिन्ही बाजुंनी येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.एस.सूर्यवंशी, पीएसआय गोकुल ठाकूर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु केले. इर्विन रूग्णालयातून तत्काळ स्ट्रेचर बोलावून मृतदेह उचलण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांना सुरूवातीला कठीण झाले होते. मृताच्या पॅन्टच्या खिशात मोबाईल व एक डायरी आढळून आली. त्यावरील मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी सपर्क केला असता नातलगांकडून मृतदेहाची ओळख पटली. मृत संतोष मोहिते हा शहरातील एका दूध डेअरीवर काम करीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो मूळचा कारंजा लाड येथील रहिवासी असून अमरावतीत संतोषचे सासर आहे. विलासनगरात भाड्याने खोली करून तो राहात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. (प्रतिनिधी)