ट्रकने चिरडले, शिक्षक दाम्पत्य जागीच ठार
By Admin | Updated: July 3, 2015 00:30 IST2015-07-03T00:30:27+5:302015-07-03T00:30:27+5:30
गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेगाव नाका मार्गावरील आशियाड कॉलनीनजीक रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत...

ट्रकने चिरडले, शिक्षक दाम्पत्य जागीच ठार
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेगाव नाका मार्गावरील आशियाड कॉलनीनजीक रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत शिक्षक दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी हा अपघात घडला. ट्रकची धडक एवढी जबर होती की, दाम्पत्यापैकी महिलेचे शिरच धडापासून वेगळे झाले होते. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींच्या अंगाचा नुसता थरकाप उडाला.
सुभाष प्रल्हाद हुमने (४२) व सरोजिनी सुभाष हुमने (३८, रा. केवल कॉलनी) अशी अपघातात मरण पावलेल्या शिक्षक पती-पत्नींची नावे आहेत. दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. गुरूवारी सकाळी पत्नी सरोजिनी यांना शाळेत जाण्याकरिता डेपोमध्ये सोडून सुभाष हुमने हे स्वत: ‘एमएससीआयटी’ ची परीक्षा देण्याकरिता जाणार होते. दुचाकी क्र.एम.एच.२७-ए.जी.-५१११ ने हे दाम्पत्य आशियाड कॉलनीनजीक पोहोचताच तिवस्याहून अमरावतीकडे रेतीने भरलेला ट्रक क्र. एम.एच.-३६-एफ.-९६३ येत होता. या ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून एक सायकलस्वार दुचाकीसमोर आला.
ट्रकचालकाला अटक
अमरावती : सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचे संतुलन बिघडले आणि दोघेही ट्रकच्या मागच्या चाकात आले. अपघात एवढा भयंकर होता की पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेच स्थितीवर नियंत्रण मिळविले. आरोपी ट्रकचालक संतोष देवकर याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)