उपद्रवी पारधी बांधवांना सीमेबाहेर काढले
By Admin | Updated: July 30, 2015 00:20 IST2015-07-30T00:20:17+5:302015-07-30T00:20:17+5:30
शहराच्या मुख्य चौकात उघड्यावर बस्त्यान मांडून उपद्रव घालणाऱ्या पारधी बांधवांवर बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली.

उपद्रवी पारधी बांधवांना सीमेबाहेर काढले
बेड्यावर सोडले : पोलीस, महापालिकेची संयुक्त कारवाई
अमरावती : शहराच्या मुख्य चौकात उघड्यावर बस्त्यान मांडून उपद्रव घालणाऱ्या पारधी बांधवांवर बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. महापालिकेने पोलीस बंदोबस्त्यात ही कारवाई करुन ताब्यात घेतलेल्या पारधी बांधवांना त्यांच्या बेड्यावर नेऊन सोडले. यात ४५ ते ५० पारधी समाजाच्या महिला व पुरुषांचा समावेश होता.
अमरावती शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असताना शहराचे हद्स्थळ असलेल्या राजकमल चौकात उड्डाणपुलाखाली पारधी बांधवांनी ठिय्या मांडला होता. रस्त्यालगत केरकचरा, वास्तव्य, उघड्यावर स्वंयपाक, कोंबडीचे पंख व मांसाचे तुकडे ही नित्याचीच बाब झाली होती. पारधी बांधवांवर कारवाई करणे पोलिसांनी अवघड होते. परंतु महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार व पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी १६ दिवसांपूर्वी शहरात उपद्रव करणाऱ्या पारधी बांधवांना शहरातून बाहेर काढण्यासाठी बैठक घेतली. मुख्य रस्त्यालगत हैदोस घालणाऱ्या पारधी बांधवांना त्यांच्या मूळ गावी नेवून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सिटी कोतवाली पोलीस ठाणे, महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही संयुक्तपणे कारवाई केली. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या पारधी समाजाच्या महिला, पुरुष व बालकांना धामणगाव रेल्वे येथील पारधी बेड्यावर सोडण्यात आले. दर १० दिवसांनी ही कारवाई निरंतरपणे सुरु राहिल, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, उमेश सवाई यांनी दिली आहे. राजकमल चौक, नमुना, प्रिया टॉकीज समोर, जवाहरगेट व तहसील परिसरात रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या पारधी बांधवाना सीमेबाहेर काढण्यात आले आहे. शहरात पाच वर्षांनंतर रस्त्यालगत असलेल्या पारधी बांधवांना सीमेबाहेर काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात पारधी बांधवांवर अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली होती, हे विशेष. काही महिन्यांपासून वास्त्यवास असलेल्या परिसरातून पारधी बांधवांना त्यांच्या मूळ गावी बेड्यावर नेवून सोडण्याची कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)