कोरोनामुळ यात्राही लॉकडाऊनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:52+5:302021-03-10T04:14:52+5:30
अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील बहुतांश गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. काही गावांतील आगामी ...

कोरोनामुळ यात्राही लॉकडाऊनच
अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील बहुतांश गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. काही गावांतील आगामी यात्रा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नगण्य असणारी कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवांवर मर्यादा आली आहे.
गतवर्षी यात्रा-जत्रांच्या हंगामात कडक लॉकडाऊनचा अनुभव नागरिकांनी घेतला. यंदा पुन्हा यात्रांच्या हंगामावर कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल थांबणार आहे. फेब्रुवारी ते मे दरम्यान ग्रामदैवताची यात्रा उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा होता. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे यात्रा, निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळे, शाळा, महाविद्यालये बंद ठेवत या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. चालू वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाले होते. परंतु, फेब्रुवारीच्या माध्यमातून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने या वर्षीदेखील यात्रा-जत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बॉक्स
भाविकांची वर्दळ नाही थांबणार
ग्रामीण भागातील यात्रा दरवर्षी आनंदाने आणि उत्साहात साजरी केली जाते.
यात्रांसाठी बाहेरगावचे नातेवाईक येतात. या माध्यमातून आप्तस्वकीयांमध्ये आपुलकीची भावना वाढीस लागते. मात्र, यंदाही वर्दळ अनुभवण्यास मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
बॉक्स
व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर
यात्रा-जत्रांनिमित्त संबंधित ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे यात्रांचा हंगाम सर्वसामान्यांसाठी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरत असतो. मात्र, चालू वर्षीही या गावाचा आनंद नागरिकांना घेता येणार नसल्याचे सद्यस्थितीवरून दिसून येते. व्यावसायिकांमध्ये मात्र यामुळे नाराजीचा सूर दिसून येत आहे.