न्यायालयात आदिवासींचा राडा
By Admin | Updated: July 6, 2016 00:05 IST2016-07-06T00:05:34+5:302016-07-06T00:05:34+5:30
गुगामल वन्यजीव अंतर्गत हरिसाल व्याघ्र जंगलात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सायल शिकारप्रकरणी वनकोठडीत असलेल्या....

न्यायालयात आदिवासींचा राडा
आरोपीला मारहाण प्रकरण : एसडीपीओ, ठाणेदारांचा ठिय्या
श्यामकांत पाण्डेय धारणी
गुगामल वन्यजीव अंतर्गत हरिसाल व्याघ्र जंगलात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सायल शिकारप्रकरणी वनकोठडीत असलेल्या आडा पटेल श्रीकृष्ण ओंकार जावरकर (४८, रा. पोटीलावा) याला वनकोठडीत मारहाण झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ संतप्त झाले आणि मंगळवारी त्याला न्यायालयात उपस्थित करण्याची माहिती मिळताच आदिवासींनी न्यायालयासमोर राडा केला. ही घटना मंगळवारी घडली.
सायल शिकारप्रकरणी १ जुलै रोजी पोटीलावा येथील आडा पटेल श्रीकृष्ण जावरकर याला अटक करण्यात आली होती. येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने मंगळवारपर्यंत त्याला वनकोठडी दिली होती. मात्र, वनकोठडीत श्रीकृष्णला वनकर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची बातमी गावकऱ्यांना कळताच गावात तणाव निर्माण झाला. मंगळवारी श्रीकृष्णला न्यायालयात उपस्थित केले जाणार होते. ही माहिती मिळताच संतप्त गावकरी न्यायालय परिसरात दाखल झाले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार के.बी.गवई, एपीआय महादेव भारसाकळे पोलीस दलासह न्यायालयात पोहोचले. एसडीपीओ सेवानंद तामगाडगे यांच्या उपस्थितीत जमावाला पांगविण्यात आले. माजी आमदार राजकुमार पटेल हे सुद्धा न्यायालयात दाखल झाले. २६ मे रोजी पोटीलावा येथील गोविंद जावरकर याचे शेतातून वनविभागाने सायलचे ५०० ग्रॅम मांस जप्त केले होते. मात्र, आरोपींनी पळ काढला होता. आरएफओ ए. एल. सुलतणे, वनपाल बी. आर. पवार, वनरक्षक ओंकार शेळके, समाधान कांबळे यांच्यासह बंदोबस्त तैनात होता. न्यायालयाने आरोपी श्रीकृष्णची जामिनावर सुटका केल्याने संतप्त झालेल्या पोटिलावा ग्रामस्थांचा संताप निवळला. (तालुका प्रतिनिधी)
‘आडा पटेल’म्हणजे काय ?
श्रीकृष्ण जावरकर हा पोटीलावा गावातील आडा पटेल आहे. मेळघाटातील प्रथेनुसार गावात एका व्यक्तीची आडा पटेल म्हणून नियुक्ती केली जाते. याला शासनाने नियुक्त केलेल्या पोलीस पाटलापेक्षा अधिक सन्मान गावकरी देतात. त्यामुळे आडा पटेलला झालेल्या अटकेच्या विरोधात मंगळवारी न्यायालयात आदिवासींनी धडक दिल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.