आदिवासी व्याघ्र संरक्षण भरतीत भेदभाव

By Admin | Updated: May 27, 2015 00:24 IST2015-05-27T00:24:49+5:302015-05-27T00:24:49+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यासाठी संवर्गातील पदासाठी सरळ सेवेने भरतीसाठी ...

Tribal Tiger Conservation Recruitment Discrimination | आदिवासी व्याघ्र संरक्षण भरतीत भेदभाव

आदिवासी व्याघ्र संरक्षण भरतीत भेदभाव

हेच का अच्छे दिन : अचलपूर तालुक्यातील आदिवासी युवकांना वगळले
नरेंद्र जावरे अचलपूर
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यासाठी संवर्गातील पदासाठी सरळ सेवेने भरतीसाठी अनुसूचित क्षेत्रातील धारणी व चिखलदरा तालुक्यातीलच आदिवासींसाठी आरक्षित केली आहे. या भरतीत मेळघाट मतदारसंघात येणाऱ्या अचलपूर तालुक्यातील आदिवासी युवकांना डावलल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अमरावती वनवृत्ताच्या आस्थापनेवरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार ८१ वनरक्षकांची पदे भरण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ मे २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या वनविभागाने जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील आदिवासी युवकांसाठीच ८१ वनरक्षक पदासाठी भरती असल्याचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. परिणामी अचलपूर तालुक्यातील शेकडो युवकांना या भरतीपासून वंचित राहावे लागत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.
१९ गावांचा समावेश
मेळघाट विधानसभा मतदारसंघांतर्गत धारणी, चिखलदरा दोन्ही तालुक्यांसह अचलपूर तालुक्यातील जवळपास ८० गावांचा समावेश आहे. त्यातील बोपापूर, पिंपळखुटा, वझ्झर, निमकुंड, बुरडघाट, काळवीट, गोंडविहीर, म्हसोना, बेलखेडा, पांढरी, सालेपूर, वडुरा, निमदरी, दातुरा, मुरादपूर, येणी, जांभळा, उपातखेडा व शहापूर वडगाव अशी आदिवासी गावे असून त्यामध्ये सहा हजारांवर लोकसंख्या आहे. या गावातील आदिवासींना माडा व मिनी म्हाडा योजनेंतर्गत उपाययोजनेचा लाभ दिले जाते.

ती म्हणाली..... हेच का अच्छे दिन
परतवाडा शहरातील एक्स्ट्रीम सायबर सेंटरवर चिखलदरा व धारणी तालुक्यातील अनेक आदिवासी युवक-युवती आॅनलाईन अर्ज भरती प्रक्रियेसाठी मंगळवारी आले होते. पिंपळखुटा येथील सविता बेलसरे व अंजिता तोटे यासुद्धा आल्या होत्या. युवक-युवती व्याघ्र प्रकल्प संरक्षण दलात उमेदवारी अर्ज भरत होते. मात्र आपण मेळघाट मतदारसंघात असून आपणास उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा का नाही. ‘हेच का अच्छे दिन’ म्हणत दोघींचे डोळे पाणावले. राज्य शासनाच्या या भेदभावपूर्ण कृतीवर त्यांनी रोष व्यक्त करीत भरती प्रक्रियेत स्थान देण्याची मागणी केली.

कुठे गेलेत आमदार ?
मेळघाट विधानसभा मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील आदिवासी युवक आणि युवतींना थेट भरतीपासून डावलण्यात आले असताना मेळघाट मतदारसंघाचे आमदार प्रभूदास भिलावेकर गेलेत कुठे, असा संतप्त सवाल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी केला आहे. राज्य शासनापर्यंत व्यथा पोहोचविणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.

मेळघाट मतदारसंघात व्याघ्र संरक्षण भरतीमध्ये राज्य शासनाचा आदिवासीमध्ये भेदभाव करणे योग्य नाही. आपण संबंधित मंत्री व सचिवांना यासंदर्भात निवेदन देत असून या भेदभावाचा तीव्र विरोध करतो.
- केवलराम काळे,
माजी आमदार, मेळघाट क्षेत्र.

आदिवासी युवती व युवकांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. शासनाने हा भेदभाव दूर करून अचलपूर तालुक्यातील आदिवासींना नोकरीत सामावून घ्यावे.
- छाया संजय कोठे,
सरपंच, मल्हारा.

Web Title: Tribal Tiger Conservation Recruitment Discrimination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.