आदिवासी विद्यार्थिनींनी ई-लर्निंगचा लाभ घ्यावा
By Admin | Updated: August 26, 2015 00:06 IST2015-08-26T00:06:15+5:302015-08-26T00:06:15+5:30
प्रकल्प अधिकारी कार्यालय, धारणी व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या ई-लर्निंग सुविधेचा लाभ आदिवासी विद्यार्थिनींनी घ्यावा, ...

आदिवासी विद्यार्थिनींनी ई-लर्निंगचा लाभ घ्यावा
पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन : टेंब्रुसोंडा येथे ई-लर्निंगची सेवा सुरू
अमरावती : प्रकल्प अधिकारी कार्यालय, धारणी व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या ई-लर्निंग सुविधेचा लाभ आदिवासी विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी केले. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा टेंब्रुसोंडा येथे आयोजित ई-लर्निंगच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर आ. प्रभुदास भिलावेकर, पंचायत समिती सभापती दयाराम काळे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, प्रकल्प अधिकारी रमेश मवासी, उपविभागीय अधिकारी राठोड, अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, तहसीलदार कांबळे उपस्थित होते.
डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्य प्रतिमांद्वारे अभ्यास स्मरणशक्तीत कायमचा स्मरणात राहतो. त्यामुळे ई-लर्निंग हा शासन व रोटरीने केलेला उपक्रम निश्चितच यशस्वी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आदिवासीं विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांनी स्वत:ची मुले समजून त्यांना शिकवावे, असा सल्लाही त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिला. ई-लर्निंगमध्ये खंड पडणार नाही याची दक्षता घेण्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मेळघाटातील आदिवासी भागात एकूण १२ शाळांमध्ये ई-लर्निंगचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. उत्तम मार्गदर्शन व शैक्षणिक सुविधा असल्यास आदिवासी विद्यार्थीदेखील दजेर्दार गुण मिळवू शकतात, असे त्यांनी सोदाहरणाद्वारे स्पष्ट केले. मेळघाटातील समस्या निवारणासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिल्यास सामाजिक व आर्थिक विकासाला गती येईल, असे मत आमदार भिलावेकर यांनी व्यक्त केले. यावेळी शिवा मोहोड यांनी ई-लर्निंगचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. ई-लर्निंगद्वारे विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवता येते व स्पर्धा परीक्षेचे १५ हजारांच्यावर प्रश्न ई-लर्निंगमध्ये अंतर्भूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक आर. सी. काळे यांनी, तर संचालन एम.डी.काळे यांनी केले.