आदिवासी विद्यार्थ्यांनो, आॅलिम्पिक-आशियाड खेळा
By Admin | Updated: December 23, 2016 00:12 IST2016-12-23T00:12:09+5:302016-12-23T00:12:09+5:30
केंद्र व राज्य शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशिल आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांनो, आॅलिम्पिक-आशियाड खेळा
प्रवीण पोटे यांचे आवाहन : क्रीडा ज्योत पेटवून विभागीय क्रीडा स्पर्धेला थाटात सुरूवात
अमरावती : केंद्र व राज्य शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशिल आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळवावे. आॅलिम्पिक, आशियाड स्पर्धेत सहभागी होऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे भावनिक आवाहन पालकमंत्री पोटे यांनी गुरूवारी केले.
चांदूररेल्वे मार्गालगतच्या राज्य राखीव बल गट क्र.९ च्या प्रांगणात आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयांतर्गत आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, एसआरपीएफचे समादेशक जे.बी.डाखोरे, धारणीचे प्रकल्प अधिकारी एस. षण्मृगन राजन, आदिवासी विकास विभाग उपायुक्त नितीन तायडे, लेखा व वित्त उपायुक्त किशोर गुल्हाने, नगरसेविका सपना ठाकूर, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त एस.एस.जाधव, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक प्रवीण ठाकरे उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, आदिवासी हा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. विभागीय क्रीडा स्पर्धेत सुमारे २२०० आदिवासी विद्यार्थी एकवटल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आदिवासींचा विकास व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक योजनांची मुहूर्तमेढ रोवली आहे. आदिवासींना न्याय देण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळविणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे पालकमंत्री म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांनी सोयी-सवलतींचा लाभ घेत शिक्षणात आघाडी घ्यावी. आयएएस, आयपीएस होऊन समाजाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेच्या प्रारंभी १२ जिल्ह्यातून आलेले पंच आणि विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय क्रीडा स्पर्धा २२ ते २४ डिसेंबर या दरम्यान होणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन जवाहर गाडगे तर आभार प्रदर्शन नितीन तायडे यांनी केले.