आदिवासींच्या होळीवर आर्थिक संकट
By Admin | Updated: March 11, 2017 00:17 IST2017-03-11T00:17:40+5:302017-03-11T00:17:40+5:30
मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी होळीचा सण दिवाळीसारख्या अत्यंत महत्वाचा सण असतो.

आदिवासींच्या होळीवर आर्थिक संकट
विवंचना : रोहयोची मजुरी आणि शेतमालाची रक्कम थकीत, उत्सवावर सावट
श्यामकांत पाण्डेय धारणी
मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी होळीचा सण दिवाळीसारख्या अत्यंत महत्वाचा सण असतो. लहान बालकापासून युवक-युवती व वृद्धांमध्ये या सणाची प्रतीक्षा असते. उपजिविकेसाठी परप्रांतात गेलेले आदिवासी होळीनिमित्त परत आपल्या गावी येतात. आनंद आणि उत्साहात होळी सण कुटुंबांसह साजरा करतात.
गेल्या ४-५ वर्षापासून सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थिती यावर्षी नसली तरी आपल्या शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याने व विकलेल्या शेतमालाचे पैसे हातात न पडल्याने यंदाची होळीवरही आर्थिक संकटाने विरजन आणल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेत गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या कामाचाही मोबदला मिळाला नसल्याने होळी सण कसा साजरा करावा, या चिंतेत आदिवासी बांधव सापडला आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या आदिवासींची होळीसाठी शुक्रवारी धारणीत आठवडी बाजारात अत्यल्प हजेरी होती.
आदिवासी बांधवांसाठी आपली दुकाने थाटून बसलेले दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसल्याचे चित्र होते. कपडे, भांडी, मणीयारी, रंग, पिचकारींची दुकानावर गर्दी नव्हती. फक्त बांगळ्या आण बताशे एव्हडेच सामान खरेदी कण्याचे सोपास्कार पार पाडले जात होते.
होळीनंतर फगव्याची धूम
होळी जळाल्यानंतर आदिवासी बांधवांचा फगवा उत्सव सुरू होतो. फगवा म्हणजे आपल्या पारंपरिक वेशभूषेत नृत्य करीत वर्षभर केलेल्या आत्मीय जणांकडून मागितले जाणारे दाम वसुली करण्याची परंपरा आजही जपली जाते. यात रोख रकमेसह वस्तू व धान्याचा समावेश असतो. मात्र, या परंपरेला भीक मागण्याची परंपरा असल्याचे गृहित धरून मागील २० वर्षांपासून आदिवासी समाज विकास संघटनांनी बंदी आणली आहे. त्यामुळे फगवा मागण्याची प्रथा हळूहळू लोप पावत आहे.
हिरव्या होळीने साजरा होणार सण
मेळघाटातील प्रत्येक गावात होळीच्या दिवशी हिरव्या रंगाची होळी तयार केली जाते. यात जांभुळाची पाने, पळसाची पाने व फुले, तुरीशी तुरकाठी आणि लाकडांचा समावेश असतो. प्रत्येक गावात दोन होळी तयार करण्यात येते. यादिवशी गावातील पोलीस पाटील आपल्या पत्नीसह होळीची पूजा करून होळीला अग्नी देतात.
मेघनाथ, कुंभकर्णाची पूजा
होळीनंतर ४ दिवसांनी येणाऱ्या पंचमीच्या दिवशी मेघनाथाची पूजा केली जाते. हा मेघनाथ म्हणजे वरुणदेवता की रामायणातील रावणाचा पुत्र, याबाबत अनेक मतभेद आजही कायम आहेत. मात्र खाऱ्या, टेंभरू या गावात मेघनाथाला लागूनच कुंभकर्णाचीही पूजा पंचमीच्या दिवशी केली जाते. त्यावरून मेघनाथाचा संबंध रामायण काळातील असल्याचे लक्षात येते. मेघनाथाची पूजा तालुक्यातील खाऱ्या टेंभरू, पाटिया, पोटीलावा, कारा, दाबिदा येथे पंचमीच्या दिवशी मोठ्या आनंद व उत्साहाने करण्यात येते.