तंत्रज्ञानाच्या युगात वाढला ई-पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:39+5:302020-12-30T04:17:39+5:30

पान २ चे बॉटम सुमीत हरकुट चांदूर बाजार : ‘आमच्याकडे या तारखेला लग्न आहे. यायचे आहे बरे ...

The trend of sending e-magazines has increased in the age of technology | तंत्रज्ञानाच्या युगात वाढला ई-पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड

तंत्रज्ञानाच्या युगात वाढला ई-पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड

पान २ चे बॉटम

सुमीत हरकुट

चांदूर बाजार : ‘आमच्याकडे या तारखेला लग्न आहे. यायचे आहे बरे का! पत्रिका एफबीवर तर शेअर केलीच आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला खास इन्व्हिटेशन कार्ड पाठवले आहे.’ असे ई-संदेश आता लोकांच्या अंगवळणी पडले आहेत. तंत्रज्ञानाची कास धरलेल्या युवा वर्गामध्ये आता पारंपरिक निमंत्रणाची कास सोडून ई-पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तुळशी विवाह होताच लग्नसराईची धूम आता सुरू झाली आहे. त्यात हा प्रकार सर्वाधिक दिसून येत आहे.

नोकरीच्या निमित्ताने अनेक युवक वेगवेगळ्या शहरांत राहतात. लग्नासाठीच अनेक युवक गावाच्या चकरा घालतात. पूर्वी नोकरीच्या शोधात बाहेर जाण्यासाठी सहसा कुणी तयार होत नव्हते. त्यामुळे मित्रपरिवारही आसपासच राहायचा. आज जग विस्तारल्याने अनेक मित्र एकमेकांपासून दुरावत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मात्र ते एकमेकांशी जोडलेले आहेत.

एखाद्याचे लग्न जुळताच आप्तमित्रांना पत्रिका पाठवायची कशी, हा प्रश्न पूर्वी भेडसावायचा. मग कसातरी मित्राचा पत्ता मिळवून त्यावर पत्रिका पाठवली जायची. ती मिळाली तर ठीक. नंतर ई-मेल चा उपयोग काही वर्षांपूर्वी केला जात होता. पुढे जाऊन फेसबूकवर लग्नपत्रिका मित्रांना शेअर व्हायला लागल्या. हल्ली काहीच वर्षांपूर्वी आलेल्या व्हॉट्सअप या मॅसेंजर अ‍ॅपवर पत्रिकेची इमेज लगेच पाठवणे शक्य झाले आहे. अशी ही पत्रिका पाठविल्यानंतर ‘मित्रा पत्रिका पाठवली आहे, यावेच लागेल’, असा संवाद

होतो.प्रिंटिंग व्यवसायास बाधक

ई-पत्रिकेच्या ट्रेंडमुळे पत्रिका छापून देण्याचा व्यवसाय कोरोनाकाळात तरी मंदावला आहे. लग्नसराईत त्यावर लाखो मिळविणारे व्यावसायिक आता नवे काही करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. आता लग्न, इतर मंगलकार्ये, तेरवी, वर्षश्रद्धाच्या पत्रिकासुद्धा ऑनलाईन तयार करून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवणे सुरू झाले आहे. क्षणात अर्थात वेळेत पत्रिका पोहचविण्याचे सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक वापर

कोरोनाकाळात विवाह प्रसंगातील बडेजावालाही मर्यादा आली. प्रथम २० व नंतर ५० वऱ्हाडींची मर्यादा घालून देण्यात आली. त्यामुळे ५० लोकांसाठी काय पत्रिका छापायचा, हा विचार पुढे आला. त्यावर उपाय म्हणून विविध अ‍ॅपच्या माध्यमातून घरच्या घरी लग्नपत्रिका बनविण्यात आल्या. त्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून आप्तमित्रांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले. लहान मुलांचे बर्थडेदेखील त्याला अपवाद नव्हते.

Web Title: The trend of sending e-magazines has increased in the age of technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.