गुलाबी थंडीत रंगतेय बहिरमची यात्रा
By Admin | Updated: December 24, 2014 22:53 IST2014-12-24T22:53:29+5:302014-12-24T22:53:29+5:30
विदर्भातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या बहिरमबुवांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. राहुट्यांसह विविध खेळणींची दुकाने, आकाश पाळणे, भिंगरीवाले, मिठाई, कापड दुकानांनी यात्रा बहरली आहे.

गुलाबी थंडीत रंगतेय बहिरमची यात्रा
चांदूरबाजार : विदर्भातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या बहिरमबुवांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. राहुट्यांसह विविध खेळणींची दुकाने, आकाश पाळणे, भिंगरीवाले, मिठाई, कापड दुकानांनी यात्रा बहरली आहे.
विदर्भात प्रसिध्द असलेली ही यात्रा ३० जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. बहिरमची यात्रा ३५० वर्षांहून अधिक काळापासून भरत आहे. काहींच्या मते हजारो वर्षांपासून भरते आहे. बहिरमबुवाचे मंदिर जवळपास १२५ फूट उंचीवर आहे. त्याचा शेजारी गणपतीची आठ ते दहा फूट
उंच सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर दगडाचा नंदी आहे.
दोन-अडीच एकराच्या परिघात मंदिराचा परिसर असून मंदिराच्या पायथ्याशी विविध दुकाने थाटली आहेत. येथे नवस फेडण्यासाठी विदर्भ आणि मध्य प्रदेशातून लोक येतात. गूळ-फुटाणे रेवड्या हा बहिरमबुवांचा मुख्य प्रसाद आहे. नवस फेडण्यासाठी पूर्वी येथे हजारो बुकडे कापून रक्ताचा पाट वाहत असे. परंतु संत गाडगेबाबांनी ही प्रथा मोडीत काढली. येथे नेहमीच गाडगेबाबांचा कीर्तनाचा कार्यक्रम होत असत. त्यामुळे येथील पशुहत्येला कालांतराने आळा बसला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीही समाजप्रबोधनाद्वारे या भागातील नागरिकांच्या अंधश्रध्दा दूर केल्या. महिनाभरात येणाऱ्या यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी मंदिराच्या पायथ्याशी तीन मनकर्णा आहेत. यातील मोठी व त्यापेक्षा लहान मनकर्णा या पंचायत समिती कार्यालयास लागून तर एक पोलीस चौकीच्या मागे आहे. मोठ्या मनकर्णेतून आजही संपूर्ण यात्रेला पाणीपुरवठा केला जातो.
काशी तलावाची आख्यायिका
बहिरमच्या डाव्या बाजूला प्रसिध्द भांडी तलाव आहे. या तलावात यात्रेकरुंना पुरेशी भांडी निघायची. पण कुणीतरी ही भांडी आपल्या घरी नेल्यापासून या तलावातून भांडी निघणे कायमचे बंद झाल्याची आख्यायिका आहे. आजही हा काशी तलाव पाण्याने तुडूंब भरलेला आहे. येथील राजाच्या महालाचे काही अवशेष काशी तलावासमोर भग्नावशेष आजही येथील गतवैभवाची साक्ष देतात. काशी गंगा येथे वर्षाला अवतरते व त्यामुळेच येथील तलावास काशी तलाव म्हणत असल्याचीही आख्यायिका आहे. भाविक या तलावाला आवर्जून भेट देतात व पुरातन वैभवाचा अनुभव घेतात.
महापूजेने झाला यात्रेचा शुभारंभ
२० डिसेंबर रोजी पहाटे संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी यांनी सहपत्नीक भैरवनाथाची महापूजा करुन यात्रा शुभारंभाचे नारळ फोडले. यात्रेत व्यापारी दाखल झाले असून शनिवारी व रविवारी यात्रेत भाविकांची गर्दी जमत असून यात्रेला बहर चढला आहे.
बहिरम महोत्सवाचे विशेष आकर्षण
शेतकऱ्यांची यात्रा म्हणून या यात्रेला जसा नावलौकिक आहे तसाच हंडी (मटण) साठी प्रसिध्द आहे. हंडीतील मटणाचा आस्वाद घेण्यासाठी आजही लोक येथे येतात. पूर्वी येथील या सरदार मंडळी आपापल्या शक्तीचे प्रदर्शन करीत होते. घोडे-सैनिकांसह राहुट्या, तंबू, डेरे टाकून येथे महिनाभर मुक्काम करत असत. दोन्ही सांजेला मटणाचे जेवण आणि नवसाच्या पंगती असतात. इंग्रजी राजवटीतील ही सगळी तालेवार मंडळी आपला लवाजमा घेऊन येत. याची दखल इंग्रजी राजवटीनेही घेतली होती. त्यामुळे त्यावेळचे मामलेदार (तहसीलदार) येथे तब्बल महिनाभर राहून कोर्टही येथेच भरायचे. यात्रेत येणाऱ्या प्रत्येकासाठी टुरिंग टॉकीज तमाशाचे फड रंगायचे. लोककलेच्या नावावर बीभत्स प्रकार यात्रेत चालत असल्याची ओरड सुरु झाली. त्यामुळे याची दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी २००६ पासून या यात्रेतून तमाशा हद्दपार केला. परंतु यात्रेतील गर्दी कायम राहण्यासाठी आमदार कडू यांनी बहिरम महोत्सव, शासकीय शंकरपट, पुष्ट बालक स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, लावणी आदी कार्यक्रम राबविण्यात येतात.