प्रवाशांची तारांबळ : रेल्वे प्रशासनाची प्रचंड उदासीनता
By Admin | Updated: July 27, 2016 00:05 IST2016-07-27T00:05:45+5:302016-07-27T00:05:45+5:30
सोमवारी रात्री बरसलेल्या मूसळधार पावसाचे पाणी बडनेरा रेल्वे स्थानकातील तिकिट घर, रेल्वे पोलीस स्टेशन, बांधकाम विभागाचे कार्यालय व पार्किंग परिसरात शिरल्याने प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली.

प्रवाशांची तारांबळ : रेल्वे प्रशासनाची प्रचंड उदासीनता
बडनेरा रेल्वेस्थानक जलमय
बडनेरा : सोमवारी रात्री बरसलेल्या मूसळधार पावसाचे पाणी बडनेरा रेल्वे स्थानकातील तिकिट घर, रेल्वे पोलीस स्टेशन, बांधकाम विभागाचे कार्यालय व पार्किंग परिसरात शिरल्याने प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. ड्रेनेज चोकअप झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या उदासिनतेबद्दल रोष व्यक्त केला जात आहे.
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचे पाणी बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात साचले होते. नव्यावस्तीच्या बाजूला असलेल्या तिकिट घरासमोर पाणी साचल्याने प्रवाशांना तिकिट काढताना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. त्याचप्रमाणे स्टेशन समोरच्या पार्किंगमध्ये सर्वत्र पाणी साचले होते. आबालवृद्धांना यामुळे प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. प्रवाशांना रेल्वे स्थानकात शिरणे कठीण झाले होते. अनेक प्रवासी पाण्यात पडले सुद्धा. रेल्वे पोलीस ठाण्यातही गुडघाभर पाणी साचले होते. स्टेशन डायरी रूम, कंट्रोल रूम, लॉकअपमध्ये पाणी साचले होते. यामुळे रेल्वे पोलिसांना तसेच प्रवाशांची तारांबळ उडाली. रेल्वे पोलीस ठाण्याला लागूनच सिनिअर सेक्शन इंजिनिअर (वर्क्स) यांचे कार्यालय आहे. त्या ठिकाणाला देखील जलाशयाचे स्वरूप आले होते. या कार्यालयाकडे स्टेशन परिसरात पाणी साचू न देण्याची जबाबदारी आहे, हे विशेष. मात्र, या कार्यालयालाच पाण्याचा वेढा पडला होता.
मील चाळ झोपडपट्टीत पाणी शिरले
बडनेरा : ही परिस्थिती दरवर्षीच निर्माण होते. पाणी वाहून नेणारे ड्रेनेज सारखे चोकअप होत असल्यामुळे या परिसरातील पाणी बाहेर पडत नाही. त्यामुळेच साचून राहते. याहीवेळी बराच वेळानंतर ड्रेनेज स्वच्छ केल्यावर साचलेले पाणी मोकळे झाले. रेल्वे स्थानकात पाणी साचणार नाही, असे नियोजन रेल्वे प्रशासनाने करावे, अशा प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.
नव्या वस्तीत रेल्वे ट्रकला लागूनच मिलचाळ झोपडपट्टी आहे. सोमवारी रात्री या झोपडपट्टीत पाणी शिरले. झोपडपट्टीवासीयांची मोठी तारांबळ उडाली. घरातील किंमती वस्तू पाण्यात सापडल्या. ही झोपडपट्टी खोलगट भागात आहे. लागूनच रेल्वे ट्रॅकखालून सांडपाणी वाहून जाणारे ड्रेनेज आहे ते बुजले होते. महानगरपालिकेचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी येथे पोहोचले. नगरसेवक प्रकाश बनसोड, मनपाचे सहायक आयुक्त योगेश पिठे, स्वास्थ निरीक्षक एकनाथ कुलकर्णी, विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड, नायब तहसीलदार धीरज मांजरे, तलाठी भगत, हे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
कॅन्टीनचा केरकचरा पडतो ड्रेनेजमध्ये
रेल्वे तिकिट घराजवळ एक कॅन्टीन आहे. त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर विकण्यासाठी खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. या कॅन्टीनसमोरुनच ड्रेनेज गेले आहे. कॅन्टीनचा केरकचरा सरळ या ड्रेनेजमध्येच टाकण्यात येत असल्याची ओरड आहे. घुशींनी येथील ड्रेनेजला भगदाडे पाडली आहेत. या सर्व बाबींकडे रेल्वे प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.