‘प्रवाशांनो, आजारी असाल तर प्रवास टाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:33+5:30
केंद्र व राज्य सरकारकडून ‘कोरोना विषाणू संसर्ग काळजी करू नका. सावध राहा. लक्षणे दिसल्यास उपचार घ्या’ असा संदेश दिला जात आहे. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी अधिक राहत असल्यामुळे काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. कोरोना आजार कशापासून होतो, याचे जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत.

‘प्रवाशांनो, आजारी असाल तर प्रवास टाळा’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशात कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन, बसस्थानकांवर प्रवाशांना काळजी घेण्यासंदर्भात सतर्क करण्यात येत आहे. ‘प्रवाशांनो, आजारी असाल तर प्रवास टाळा’ अशी उद्घोषणाच बडनेरा रेल्वे स्थानकावर करण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाकडून तशा सूचना मिळाल्या आहेत.
केंद्र व राज्य सरकारकडून ‘कोरोना विषाणू संसर्ग काळजी करू नका. सावध राहा. लक्षणे दिसल्यास उपचार घ्या’ असा संदेश दिला जात आहे. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी अधिक राहत असल्यामुळे काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. कोरोना आजार कशापासून होतो, याचे जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत. कोरोना आजाराची लक्षणे, उपाययोजना, काळजी घेण्यासंदर्भात बसस्थानकावर जनजागृती करण्यात येत आहे. बडनेरा रेल्वे स्टेशनवर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याच्या उद्घोषणा करण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, पशूंचा संपर्कात राहू नका, असा संदेश दिला जात आहे. कोरोना आजारासंदर्भात रेल्वे बोर्डाचे आरोग्य संचालक के. श्रीधर यांनी पत्रव्यवहार चालविला आहे.
मुख्य सचिवांकडून सतर्कतेचे निर्देश
कोरोना विषाणूपासून होणाऱ्या आजारापासून काळजी घेण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजनांबाबात राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी आढावा घेतला. परदेशातून आलेल्यांना १४ दिवसांपर्यंत निरीक्षणात ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला टिप्स देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्याकडून कोरोना विषाणू रुग्ण, संशयितांची माहिती घेण्यात आली. जिल्हाभरात सतर्कता बाळण्याचे कळविले आहे.