मद्यप्राशन करून आॅटोरिक्षाने शाळकरी मुलांची वाहतूक
By Admin | Updated: September 30, 2015 00:26 IST2015-09-30T00:26:49+5:302015-09-30T00:26:49+5:30
मद्यप्राशन करून शाळकरी विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली.

मद्यप्राशन करून आॅटोरिक्षाने शाळकरी मुलांची वाहतूक
आॅटोरिक्षा चालकाला अटक : शहर कोतवाली पोलिसांची कारवाई
अमरावती : मद्यप्राशन करून शाळकरी विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास होलीक्रॉस हायस्कुलजवळ घडली. नीलेश नाना देशमुख (३५,रा.प्रवीणनगर) असे आरोपीचे नाव आहे.
शाळकरी मुलांची वाहतूक करणारा एक आॅटोरिक्षाचालक मद्यप्राशन करून मुले वाहून नेत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यांनी ती माहिती शहर कोतवाली पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या नेतृत्त्वात पोलीस पथक होलीक्रॉस शाळेजवळ गेले. तेथे मद्यधुंद अवस्थेत आॅटोरिक्षा चालक नीलेश देशमुख आॅटोरिक्षा क्रमांक एम.एच.२७-पी-५२९३ चालवित असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आॅटोरिक्षामध्ये सहा शाळकरी मुले शाळेतून घरी जाण्यासाठी आॅटोरिक्षात बसले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोतवाली ठाण्यात नेले. पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम १८५ (मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. आरोपीला नोटीस बजावून पोलिसांनी सोडून दिले. (प्रतिनिधी)
पालकांनी सावधगिरी बाळगावी
पाल्याच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी सावधगिरी बाळगावी. ज्या वाहनातून पालक शाळेत ये-जा करणार आहे, त्या वाहनचालकांची संपूर्ण माहिती पालकांनी एकत्रित करावी.