परिवहन कार्यालयात ‘जी फार्म’चा बोलबाला
By Admin | Updated: July 16, 2014 23:49 IST2014-07-16T23:49:54+5:302014-07-16T23:49:54+5:30
येथील प्रादेशिक परिवहन विभागात पैसे दिल्याशिवाय कोणताही कागद पुढे सरकत नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. वाहन चालविण्याचा परवाना (लर्निंग) देणाऱ्या विभागात तर दलाल म्हणतील

परिवहन कार्यालयात ‘जी फार्म’चा बोलबाला
अमरावती : येथील प्रादेशिक परिवहन विभागात पैसे दिल्याशिवाय कोणताही कागद पुढे सरकत नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. वाहन चालविण्याचा परवाना (लर्निंग) देणाऱ्या विभागात तर दलाल म्हणतील त्यांचीच कामे अगोदर होत असल्याचे चित्र आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वसुलीकरिता ‘सुमित’ नामक दलालाची नियुक्ती केली असून येथे ‘महाजनी’ कारभार सुरु आहे.
आरटीओंचा कारभार हा वरवर कागदोपत्री दिसत असला तरी या कागदावरच सर्व काही दडले आहे. या कार्यालयात प्रत्येक कामांचे आणि व्यवहाराचे कोड ठरले आहे. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दलालांकडून कामांचे पैसे मागायचे झाल्यास ‘जी फार्म’ हा शब्द प्रयोग केला जातो. या ‘जी फार्म’ शब्द प्रयोगाचा परवाना विभागात वापर केला जात आहे. लर्निंग विभागात अधिकाऱ्यांनी अपहार करताना कोणतेही गंडातंर येऊ नये, यासाठी सुमित नामक दलालाची खास नेममूक केली आहे. येथे काही महिन्यांपासून एकाच अधिकाऱ्याची कर्तव्यावर नेमणूक होत असल्याने या अधिकाऱ्याने परवान्याची वसुली करण्यासाठी दलाल नेमला आहे. कोणालाही परवान्याचे काम झाल्यानंतर सुमितकडे रक्कम जमा करावी लागते. एकदा ‘जी फार्म’ जमा झाले की, त्यानंतरच परवाना मंजूर केला जातो. अन्यथा त्रुट्या काढून परवान्यासाठी आलेला अर्ज नामंजूर केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. ‘जी फार्म’शिवाय कोणत्याही व्यक्तीचे परवाने मंजूर करायचे नाही, असे फर्मान ‘महाजनी’ अधिकाऱ्यांनी काढला आहे. लर्निंग विभागात दरदिवशी ‘जी फार्म’चे २० ते २५ हजार रुपयांची रक्कम एकट्या या अधिकाऱ्याच्या खिशात जात असल्याची माहिती आहे. आरटीओत २५० ते ३०० दलालांची संख्या आहे. त्यानुसार प्रत्येकाचे दोन ते तीन लर्निंग परवाने आल्याशिवाय राहत नाही. आरटीओत दलालाशिवाय कामे होत नसल्याने या कार्यालयाचे हेलपाटे खाण्यापेक्षा एकदा पैसे गेले तर चालेल, अशी मन:स्थिती येथे कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे आरटीओत दलालाची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येते. लर्निंग विभागात सुरु असलेल्या महाजनी कारभाराने सामान्यांना मोठा त्रास सहन करुन जादा पैसे मोजावे लागत आहे.