तपोवनातील मुलांचेही स्थानांतरण
By Admin | Updated: December 30, 2014 23:24 IST2014-12-30T23:24:39+5:302014-12-30T23:24:39+5:30
विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे सोमवारी स्थानांतरण करण्यात आल्यावर मंगळवारी पुन्हा ४४ मुलांनाही शहरातील तीन बालगृहात हलविण्यात आले.

तपोवनातील मुलांचेही स्थानांतरण
अमरावती : विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे सोमवारी स्थानांतरण करण्यात आल्यावर मंगळवारी पुन्हा ४४ मुलांनाही शहरातील तीन बालगृहात हलविण्यात आले.
तपोवनाच्या बालगृहातील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना प्रकाशात आल्यानंतर तपोवनातील मुला-मुलींना इतर सुरक्षित बालगृहांमध्ये हलविण्याचा विचार सुरू झाला होता. अखेर मंगळवारी तो सर्वार्थाने पूर्णत्वास गेला.
तपोवनातील मुला-मुलींच्या बालगृहात वास्तव्यास असलेल्या ४४ मुलांना हलविण्याची प्रक्रिया मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास सुरू झाली. बालकल्याण समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ४४ मुलांपैकी राजापेठ येथील बालगृहात १४ तर देशपांडेवाडी परिसरातील शासकीय मुलांचे बालगृह (कनिष्ठ) व अच्युत महाराज बालगृहात प्रत्येकी १४-१४ मुलांना हलविण्यात आले.
तपोवन सोडताना मुलांना गहिवरुन आले होते. नेहमी गजबजलेल्या तपोवनातील बालगृह परिसरात मंगळवारी शुकशुकाट निर्माण झाला होता.
मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. अत्याचार प्रकरणी स्वतंत्र पोलीस चौकशी सुरु आहे. मुली तक्रार देण्यासाठी समोर आल्यास आणखी काही जणांवर कारवाई होऊ शकते. असे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)