रेल्वे सुरक्षा बलाकडून गाड्यांचे सर्चिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:21 IST2019-03-25T23:20:35+5:302019-03-25T23:21:01+5:30
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाने प्रवासी गाड्यांचे ‘सर्चिंग’ चालविले आहे. रेल्वे डब्यांसह प्लॅटफार्म, तिकीट आरक्षण केंद्र, बसस्थानक, आॅटोथांबा आदी परिसर सुरक्षेच्या दृष्टीने पिंजून काढला जात आहे. बंदूकधारी आरपीएफचे विशेष जवान संशयास्पद प्रवाशांची तपासणीनंतर त्यांना सोडले जात असल्याची माहिती आहे.

रेल्वे सुरक्षा बलाकडून गाड्यांचे सर्चिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाने प्रवासी गाड्यांचे ‘सर्चिंग’ चालविले आहे. रेल्वे डब्यांसह प्लॅटफार्म, तिकीट आरक्षण केंद्र, बसस्थानक, आॅटोथांबा आदी परिसर सुरक्षेच्या दृष्टीने पिंजून काढला जात आहे. बंदूकधारी आरपीएफचे विशेष जवान संशयास्पद प्रवाशांची तपासणीनंतर त्यांना सोडले जात असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणूक लक्षात घेता रेल्वे सुरक्षा बलाने अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाहून ये-जा करणाऱ्या गाड्यांची युद्धस्तरावर तपासणी चालविली आहे. रेल्वे गाड्यांतून होणाऱ्या पार्सलवरही करडी नजर ठेवली जात आहे. दारू, गांजा व अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. विदर्भात अमरावती हे दारू विक्रीचे मुख्य केंद्र आहे. त्याअनुषंगाने वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या दारूबंदी जिल्ह्यात अमरावती किंवा बडनेरा रेल्वे स्थानकाहून रेल्वेद्वारे अनधिकृतरीत्या दारूची वाहतूक होण्याची शक्यता सुरक्षा विभागाने वर्तविली आहे. याबाबीकडे आरपीएफ जवानांनी लक्ष केंद्रित केले आहे.
अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींकडे असलेले साहित्य, बॅग तपासणी करूनच सोडले जात आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांचे मॉनिटरींग रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयातून केले जात आहे. कोण प्रवासी, कोठे चालला? त्याच्याकडील साहित्यावर कंट्रोल रूममधून लक्ष ठेवले जात आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, लगेज स्कॅनर बसविण्यात आले असून, तेदेखील सुरक्षेसाठी लाखमोलाचे ठरत आहे.
आरपीएफचे बंदूकधारी 'टास्क फोर्स'
बडनेरा रेल्वे स्थानकावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीएफचे बंदूकधारी 'टास्क फोर्स' तैनात आहे. या फोर्सकडे सुरक्षेच्या अनुषंगाने हॅन्ड डिटेक्टर, संवादाकरिता वॉकीटाकी, अत्याधुनिक शस्त्रे आहेत. सुरक्षेच्या अनुषंगाने रेल्वे गाड्यांसह प्लॅटफार्म पिंजून काढताना कचराकुंडी, खाद्यपदार्थ स्टॉल, खानावळ, तिकीट केंद्रांना लक्ष्य केले आहे.
रेल्वे गाड्या आणि प्लॅटफार्मची नियमित तपासणी सुरू असते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केल्यापासून रेल्वे विभागाने ‘अलर्ट’ जारी केले आहे. निवडणुकी दरम्यान अवैध दारू, काळ्या पैशांची वाहतूक आणि अंमली पदार्थाची तस्करी होण्याचे संकेत वरिष्ठांनी दिले आहे. त्यानुसार आरपीएफने रेल्वे गाड्यांमध्ये सर्चिंग चालविले आहे.
- राजेश बढे, निरीक्षक,
रेल्वे सुरक्षा बल, बडनेरा