आदिवासी विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे आयएएस, आयपीएसचे प्रशिक्षण
By Admin | Updated: August 10, 2015 00:00 IST2015-08-10T00:00:01+5:302015-08-10T00:00:01+5:30
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देश आणि समाजाची सेवा करावी, ...

आदिवासी विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे आयएएस, आयपीएसचे प्रशिक्षण
पालकमंत्र्यांची घोषणा : जागतिक आदिवासी अस्मिता दिन उत्साहात
अमरावती : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देश आणि समाजाची सेवा करावी, यासाठी आता शासनाकडून त्यांना तीन महिन्यांचे नव्हे तर तीन वर्षांचे आयएएस, आयपीएस, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम व खनिकर्म उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे केली.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात रविवारी अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. खासदार आंनदराव अडसूळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राजू तोडसाम, माजी महापौर वंदना कंगाले, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त अशोक आत्राम, सहायक आयुक्त लेखापरीक्षक किशोर गुल्हाने, विठ्ठल मरापे, संजय मडावी, रामेश्वर युवानाते, हेमराज राऊत, सुरेश पटेल, दादाराव सलामे, रमेश धुर्वे, महादेव राघोर्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत शासनाने आदिवासी समाजासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतलेत. या निर्णयाची अंमलबजावणी आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत. हा समाज संस्कृती, रुढी, परंपरा जोपासणारा आहे. त्यांच्या संस्कृती संवर्धनासाठीसुध्दा सर्वांनी पुढाकार घ्यावा. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिका आणि शिकवा हा मूलमंत्र ध्यानी ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. आदिवासी विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेव्दारे उच्च पदावर आरुढ व्हावा, यासाठी शासनाच्यावतीने प्रशिक्षण योजना आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन वर्षांचा करण्यासाठी शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री पोटे यांनी दिली.
या कार्यक्रमानिमित्त अमरावती, लातूर व औरंगाबाद या विभागातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, धनादेश देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती खेडाळू अनिल तोडकर यांनाही गौरविण्यात आले. मेळघाटातील अपघातग्रस्त कुटुंबातील मातृछत्र हरविलेल्या तीन मुलांचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल ज्योती तोटेवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंत मानव विकास संस्थेव्दारे निर्मित ‘मी बिरसा मुंडा बोलतोय’ ही एकांकिका सादर करण्यात आली. संचालन गाढवे व ज्योती तोडकर यांनी केले.
बहुतांश लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ
आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला निमंत्रितांची लांबलचक नावे असलेली कार्यक्रम पत्रिका छापण्यात आली. मात्र पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ व आ. राजू तोडसाम वगळता एकाही लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमात हजेरी लावली नाही. यात गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, महापौर चरणजित कौर नंदा, जिल्हा परिषदचे अध्यक्ष सतीश उईके, माजी मंत्री मधुकर पिचड, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, खासदार रामदास तडस यांच्यासह श्रीकांत देशपांडे, सुनील देशमुख, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर, रवी राणा, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले,अशोक उईके, संतोष टारफे यांचा समावेश आहे.