चांदूर रेल्वे : प्रधानमंत्री राष्ट्रीय पीक विमा योजनेचा लाभ ठरविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी घोषित होणारी मदत ठरविण्यामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या पीक कापणी प्रयोगासंबंधी प्रशिक्षणाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत नुकतेच तहसील कार्यालयात करण्यात आले.
पीक कापणी प्रयोगाच्या प्रशिक्षणाला आणि कृषी विभागसह तिन्ही यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते. रबी हरभरा आणि बागायती गहू या पिकांच्या कापणी प्रयोगाची माहिती त्यांनी घेतली. पीक कापणी प्रयोगाचा उद्देश, महत्त्व, ग्रामस्तरीय समितीची भूमिका, पीक कापणी प्रयोगाच्या शेतीची निवड, प्लॉटची निवड, त्यासाठी वापरण्यात येणारे रॅन्डम अंकांची निवड, पीक कापणी प्रयोगाचे सीसीई ॲप याबाबत धानोरा म्हाली येथील कृषिसहायक नरेंद्र पकडे आणि बोरी येथील अमोल चौकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तहसीलदार राम इंगळे, तालुका कृषी अधिकारी बांबल यांच्यासह पोलीस पाटील, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहाय्यक यांची याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थिती होती.