व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून तेंदुपानाची तस्करी
By Admin | Updated: May 19, 2014 23:02 IST2014-05-19T23:02:54+5:302014-05-19T23:02:54+5:30
मेळघाटातील प्रादेशिक वन विभागातर्फे धारणी, ढाकणा, रेल्वे धूळघाट या वनपरिक्षेत्रात तेंदुपान संकलनाचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र संबंधित तेंदुपान कंत्राटदाराने वनपरिक्षेत्रासह व्याघ्र प्रकल्पातून

व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून तेंदुपानाची तस्करी
राजेश मालवीय - धारणी मेळघाटातील प्रादेशिक वन विभागातर्फे धारणी, ढाकणा, रेल्वे धूळघाट या वनपरिक्षेत्रात तेंदुपान संकलनाचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र संबंधित तेंदुपान कंत्राटदाराने वनपरिक्षेत्रासह व्याघ्र प्रकल्पातून तेंदुपान अवैधरीत्या तोडणे सुरू केल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. नियमबाह्य व्याघ्र प्रवेशामुळे मजुरांसह वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रादेशिक वनपरिक्षेत्र सोडून व्याघ्र प्रकल्पातूनच तेंदुपान तोडण्याचे काम जोरात सुरू आहे. उन्हाळ्यात दिवसांत व्याघ्र क्षेत्रात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशातच तेंदूपान तोडणार्या मजुरांचा वन्यप्राण्यांना धोका वाढला आहे. त्यामुळे तेंदुपान तोडणीवर बंदी तर रात्रीची वाहतूकही बंद करण्यात येत आहे. अशा वन अधिनियमाला न जुमानता वनपरिक्षेत्र अधिकारी व व्याघ्र प्रकल्प अधिकार्यांनी तेंदुपान कंत्राटदार आर्थिक देवाण-घेवाण करून प्रतिबंधित व्याघ्र प्रकल्पातून तेंदूपान तोडण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. कंत्राटदाराच्या निर्देशावर मजूरवर्ग व्याघ्र प्रकल्पातून तेंदुपान तोडत असून काही मजुरांकडून चक्क टेंभरूचे वृक्ष कापून फेकले जात आहे. हा संपूर्ण प्रकार वन अधिकारी, वनरक्षक, व्याघ्र प्रकल्प अधिकार्यांसमोर सर्रास सुरू आहे. तेंदुपाने संकलनासाठी भल्या पहाटे मजूर वर्ग व्याघ्र जंगलात प्रवेश करतात. मात्र, पहाटेच वन्यप्राणी पाण्यासाठी पाणवठय़ाकडे येत असतात. यावेळी वन्य प्राण्यांकडून हल्ला होण्याची भीती असते. मजुरांकडेही शस्त्रे असल्यामुळे एकमेकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील धारणी, ढाकणा, धूळघाट रेल्वे या वनपरिक्षेत्रालगतच ेव्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव गुगामल, ढाकणा व्याघ्र प्रकल्प, चौराकुंड, हरिसाल या क्षेत्रात वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. मात्र, मजूर व्याघ्र क्षेत्रातून सर्वाधिक तेंदुपाने संकलित करीत आहेत. काही मोजक्या रकमेत दरवर्षी तेंदुपाने कंत्राटाद्वारे दिली जाते. त्या बदल्यात वनविभाग व व्याघ्र प्रकल्पातील पूर्ण मेळघाटचे जंगल कंत्राटदाराच्या स्वाधीन केले जाते. कंत्राटदाराची वनरक्षकापासून वनाधिकारी, व्याघ्र प्रकल्प अधिकार्यांसोबत सेटिंग असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून वन्य प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता आहे. अधिकार्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.