अवैध व्यावसायिकांची धरपकड

By Admin | Updated: December 18, 2015 00:44 IST2015-12-18T00:44:06+5:302015-12-18T00:44:06+5:30

परिसरात अनेक ठिकाणी गावठीसह देशी, विदेशी दारुची अवैध विक्री सुरू असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

Trafficking of illegal businessmen | अवैध व्यावसायिकांची धरपकड

अवैध व्यावसायिकांची धरपकड

पोलिसांची कारवाई : अवैध धंद्यांना कंटाळले होते नागरिक
पुसला : परिसरात अनेक ठिकाणी गावठीसह देशी, विदेशी दारुची अवैध विक्री सुरू असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता भंग पावत असल्याने अनेकवेळा तक्रारी झाल्यात. मात्र दखल घेतली नाही. म्हणून ग्रामपंचायतीने अवैध धंदे बंद करण्याचा ठरावच घेतला. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी अवैध धंदेवाईकांची धरपकड सुरू केली आहे.
ग्रामपंचायत पुसला यांनी घेतलेल्या ठरावानुसार येथे जुगार, अवैध देशी, विदेशी तसेच गावठी दारुविक्री सर्रास सुरू असते. यामुळे गावातील शांतता, सलोखा तसेच कायदा व सुवय्वस्था भंग पावत आहे. भांडण, तंटयामध्येसुध्दा वाढ झाली आहे तर चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. अवैध धंदे बंद केल्यास गैरप्रकाराला आळा बसू शकते. यामुळे पुसला गावातील अवैध धंदे ताताडीने बंद करण्यात यावे, असा ठराव मासिक सभेमध्ये ३० नोव्हेंबर २०१५ ला सर्वानुमते घेण्यात आला होता. अनेकवेळा येथे क्षुल्लक कारणावरून मद्यधुंद लोकांकडून भांडण, तंटे होतात तर अनेकांचे संसारसुध्दा व्यसनाधिनतेमुळे बिघडले आहेत. रस्त्यावरच दारू विक्री होत असल्याने मद्यपीकडून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिला, तरुणी तसेच वृध्दांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत अनेकवेळा पोलीस प्रशासनाला माहिती तसेच तक्रारी देऊनही योग्य कारवाई झाली नाही.
अखेर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी सुचविल्यानुसार सत्ताधारी तसेच विरोधी सर्व सदस्यांनी आवाजी मतदानाने अवैध धंदे बंद करण्याचा ठराव घेतला. याबाबत 'लोकमत'ने १५ डिसेंबरच्या अंकात ‘पुसला येथे अवैध धंद्याचा सुळसुळाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त झळकताच पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Trafficking of illegal businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.