पोलिसांनीच उभारला वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:30+5:302021-02-09T04:14:30+5:30

असुरक्षित वाहतुकीचे शहरभर जाळे, वाहतूक मुख्यालयासमोरही नियमांचे उल्लंघन अमरावती - सामान्यांकडून वाहतूक नियमांचे पालन करवून घेण्याचे ज्यांचे कर्तव्य आहे, ...

The traffic was obstructed by the police | पोलिसांनीच उभारला वाहतुकीला अडथळा

पोलिसांनीच उभारला वाहतुकीला अडथळा

असुरक्षित वाहतुकीचे शहरभर जाळे, वाहतूक मुख्यालयासमोरही नियमांचे उल्लंघन

अमरावती - सामान्यांकडून वाहतूक नियमांचे पालन करवून घेण्याचे ज्यांचे कर्तव्य आहे, त्यासाठीच ज्यांना वेतन मिळते, त्या वाहतूक पोलिसांनीच मुख्य मार्गावर वाहतुकीला अडथळा उभारला आहे. हा अडथळा थेट वाहतूक मुख्यालयासमोर असल्याने जणू ती कायदेसंगत कृती असावी, अशा दिमाखात तो राेज हजारो नागरिकांसमोर मिरवला जातो आहे.

इर्विन चाैकानजीक असलेल्या वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक मोठा ट्रक दीर्घ कालावधीपासून उभा आहे. रस्ता हा अनेक महिने अवजड वाहन उभे करण्याची जागा असू शकतो काय? संबंधित रस्ता नागपूरकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा आहे. कठोरा, परतवाडा आणि नागपूर रस्त्यांवरील वस्त्यांमध्ये शहरातील जी मोठी लोकसंख्या वास्तव्याला आहे, तिचा प्रवास त्याच मार्गाहून होतो. शासकीय वसाहतींचा रस्ताही तोच. अनेक महाविद्यालये, क्रीडा संकुल त्या मार्गावर असल्यामुळे विद्यार्थी, महिला, मुली लहान मुलांची आणि खेळाडूंची मोठी वर्दळ त्या मार्गावर असते. वाहतूक पोलीस कार्यालयानजीक जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. मोर्शी मार्गाहून येणाऱ्या अनेक रुग्णावाहिका त्याच मागार्वरून रुग्णालयात जातात. बडनेराकडे जाणाऱ्या प्रवाशांचा तो प्रमुख मार्ग. तो मार्ग म्हणजे, जिल्ह्याची लोकवाहिनीच. अशा मार्गावर दोन-दोन महिने अवजड वाहने उभी करून ठेवली जात असतील, तर येता-जाता वाहतूक कायार्लयासमोरील ती स्थिती बघणाऱ्या वाहनचालकांनी त्यातून काय? बोध घ्यावा?

अमरावती शहरात बेशिस्त आणि असुरक्षित वाहतुकीचा सुळसुळाट आहे. चाैकाचाैकांत नेमलेले वाहतूक पोलीस घोळक्याने उभे राहून गप्पा करतानाचे चित्र आता सरावाचे झाले आहे. गप्पा मारायला सहकारी नसेल, तर ते पोलीस मोबाईल स्क्रीनवर व्यस्त असतात. पुणे, मुंबई असाे वा लगतचे नागपूर - या शहरांत वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करताना दिसतात. अमरावतीत हे चित्र बघणे हा शहरवासीयांसाठी सुखद धक्का असेल. चाैकातील वाहतूक आपसूक चालायची तशी चालते. व्हायची तशी नियंत्रित होते. चाैकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे त्यात योगदान नसण्याची सवय जशी पोलिसांना, तशीच ती वाहनचालकांनाही झाली आहे. पोलिसांसमोर ट्रिपल सिट, राॅग साईड वाहन नेताना त्याचमुळे शहरातील वाहनचालकांना वर्दीचे नि कायद्याचे भय वाटत नाही. सुधार हमखास शक्य असला तरी ही असुरक्षित आणि बेशिस्त वाहतूक सुधारावी, अशी इच्छाशक्ती शहर पोलिसांची दिसून येत नाही. किमान वाहतूक शाखेचे दोन पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त ज्या कार्यालयात बसतात, तेथे तरी वाहतूक नियमांचे धडधडीत उल्लंघन रोखण्याची तसदी वाहतूक शाखेने घ्यावी.

Web Title: The traffic was obstructed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.