वाहतूक शाखेच्या पोलिसाने हातगाडी चालकांच्या श्रीमुखात लगावली
By Admin | Updated: January 8, 2016 00:18 IST2016-01-08T00:13:03+5:302016-01-08T00:18:09+5:30
वाहतूक शाखेच्या पोलिसाने नारळ पाणी विकणाऱ्या हातगाडी चालकाच्या श्रीमुखात लगावली. ही घटना गुरुवारी गांधी चौक मार्गावर घडली.

वाहतूक शाखेच्या पोलिसाने हातगाडी चालकांच्या श्रीमुखात लगावली
गांधी चौकातील घटना : घटनास्थळी बघ्यांची गर्दी
अमरावती : वाहतूक शाखेच्या पोलिसाने नारळ पाणी विकणाऱ्या हातगाडी चालकाच्या श्रीमुखात लगावली. ही घटना गुरुवारी गांधी चौक मार्गावर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
गांधी चौक ते राजकमल चौकादरम्यानच्या अनेक हातगाडी चालक व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतूक शाखा पोलीस दररोज हातगाडी चालकांना समज देऊन वाहतूकीस अडथळा निर्माण करू नका अशा सूचना देतात. मात्र, तरीसुध्दा पोलीस जाताच पुन्हा हातगाडी चालक मार्गावर येऊन व्यवसाय करिताना आढळून येतात. गुरुवारी राजापेठ उपविभागाच्या वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक बळीराम डाखोरे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह गांधी चौकातील वाहतूक नियंत्रीत करीत होते. दरम्यान त्यांना गांधी चौक मार्गावर शेख हयाद नामक हातगाडी चालक नारळ पाणी विक्री करताना आढळला. त्यामुळे पोलीस कर्मचारी लक्ष्मण कातकडे यांनी वाहनातून खाली उतरून हातगाडीवरील छत्री जप्त केली. मात्र, गरीब शेख हयाद याने छत्री परत मिळावी याकरिता पोलिससमोर विनवणी केली. त्यांच्या मागे लागून छत्री मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पोलिसांनी त्याचे एक न ऐकता उलट हातगाडी चालकांच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे शेख हयाद यांचे तोंड फुटले, त्यांच्या तोंडातून रक्त बाहेर आले. मात्र पोलिसांच्या मनाला पाझर फुटला नाही. पोलिसांनी हातगाडी चालकाची छत्री जप्त करून वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न केले होते. मात्र, या घटनेमुळे अन्य हातगाडी चालकांचे दाबे दणाणले होते.
पोलीस कर्मचाऱ्यांना हातगाडी चालकाला व्यवस्थित हॅन्डल करता आले नाही, असे दिसून येत आहे. समज गैरसमज निर्माण होऊन हा प्रकार घडला असावा. यासंदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यात आले आहे. पुढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेऊ.
- बळीराम डाखोरे,
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा. राजापेठ उपविभाग.