वाहतूक शाखेचे होणार तीन 'सेक्टर'
By Admin | Updated: September 10, 2014 23:17 IST2014-09-10T23:17:11+5:302014-09-10T23:17:11+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे तीन सेक्टर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या तीन विभागांची जबाबदारी त्या-त्या ठिकाणी कार्यरत पोलीस निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे होणार तीन 'सेक्टर'
पोलीस आयुक्तांची माहिती : वाहूतक नियंत्रणासाठी विभाजनाचा प्रयोग
अमरावती : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे तीन सेक्टर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या तीन विभागांची जबाबदारी त्या-त्या ठिकाणी कार्यरत पोलीस निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच वाहतूक शाखेचे हे तीन विभाग (सेक्टर) कार्यन्वित होतील, अशी माहिती पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहर वाहतूक शाखेचे पूर्व व पश्चिम असे दोन झोन बनाविण्यात आले आहे. पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केली जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरातील मुख्य चौकात ट्रॅफीक बुथ बनविण्यात आले असून प्रत्येक बुथमध्ये एक वाहतूक पोलीस तैनात राहील. ध्वनीक्षेपकाद्वारे सदर कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी निर्देश देईल. शहरात दिवसेंदिवस वाढत्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविणे, हा वाहतूक शाखेचा मुख्य उद्देश आहे.
वाहतूक शाखेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांची कामगिरीही उत्तम आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पूर्व व पश्चिम झोनमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षकांची असमाधानकारक कामगिरी लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी पूर्व व पश्चिम झोनमधील दोन पोलीस निरीक्षकांची वाहतूक शाखेतून तडकाफडकी उचलबांगडी केली होती. या दोन्ही झोनचा प्रभार त्यांनी पोलीस निरीक्षक विजय साळुंखे यांच्याकडे सोपविला आहे.
दरम्यान आयुक्तांनी वाहतूक व्यावस्थेत आणखी काही नवे बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्या निर्णयाच्या अनुशंगानेच तीन नवे सेक्टर बनविण्यात येणार आहेत. शहरात राजापेठ, गाडगेनगर व फ्रेजरपुरा अशा तीन विभागांमध्ये पोलीस ठाण्यांची विभागणी झाली आहे. या विभागांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांची आहे. याच धर्तीवर वाहतूक शाखेचेही राजापेठ, गाडगेनगर व फ्रेजरपुरा असे तीन सेक्टर (विभाग) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण सुरळीत होईल.
प्रत्येक विभागात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक तैनात केले जातील. वाहतूक शोखेत सध्या कार्यरत वाहतूक पोलिसांची देखील या तीन नव्या विभागांमध्ये विभागणी केली जाईल. राजापेठ,गाडगेनगर परिसरात सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता या विभागात अधिक संख्येने वाहतूक कर्मचारी तैनात केले जातील. तीनही विभागांची मोठी जबाबदारी तीन पोलीस निरीक्षकांकडे असेल.