शेकडो वर्षांची गोटमाराची परंपरा यंदाही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:38+5:302021-09-08T04:17:38+5:30
कॅप्शन : जांब नदीतून झेंडा काढण्यासाठी गोठमारीत सहभागी झाले सावरगाव, पांढुर्णा येथील नागरिक प्रशासनाचे आदेश पांढुर्ण्याच्या लोकांनी झुगारले, श्रद्धेपुढे ...

शेकडो वर्षांची गोटमाराची परंपरा यंदाही कायम
कॅप्शन : जांब नदीतून झेंडा काढण्यासाठी गोठमारीत सहभागी झाले सावरगाव, पांढुर्णा येथील नागरिक
प्रशासनाचे आदेश पांढुर्ण्याच्या लोकांनी झुगारले, श्रद्धेपुढे कोरोना झाला नतमस्तक, हजारो लोकांना अपंगत्व आणि ७५ वर्षात गेले १४ लोकांचे प्राण
संजय खासबागे / वरूड (अमरावती) : येथून ३५ किमी अंतरावरील मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून एका आख्यायिकेच्या आधारावर सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जांब नदीतील पळसाचा झेंडा काढण्याकरिता चढाओढ करून गोटमार केली जाते. हीच गोटमार यात्रा पोळ्याच्या करीला यंदाही भरली. हजारो लोकांना अपंगत्व आले. त्यात दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग आहे. तरीही प्रशासनाचे आदेश झुगारून दोन्ही गावांच्या लोकांनी गोटमारीत सहभाग घेतला.
मध्यप्रदेशातील शेवटचा तालुका पांढुर्णा आहे. या जांब नदीमुळे शहराचे दोन भाग पांढुर्णा आणि सावरगाव असे झाले आहे. तीनशे वर्षांपूर्वी एका प्रेमीयुगुलाच्या विवाहाला दोन्ही पक्षांकडून विरोध झाला आणि लग्न करून जात असताना या जांब नदीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची आख्यायिका आहे. सावरगावची मुलगी पांढुर्ण्यातील मुलाच्या प्रेमात पडल्याने तिला आणताना झालेला विरोध एकमेकांवर गोटमार करून दर्शविला जातो. त्यानिमित्त मंगळवारी सकाळी सूर्योदयापूर्वी नित्यनेमाने वाजतगाजत जाऊन पळसाचा झेंडा विधिवत पूजा करून जांब नदीच्या मध्यभागी लावला गेला. चंडीमातेच्या मंदिरात भाविकांनी पूजन केले. गोटमारीतील जखमींसाठी पांढुर्णा येथे दोन आणि सावरगाव येथे दोन असे वैद्यकीय कॅम्प प्रशासनाच्यावतीने लावण्यात आले होते. जखमींची संख्या सायंकाळी उशिरा मिळेल, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने अघोरी गोटमार यात्रा बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले. तथापि, नागरिक स्वयंस्फूर्तीने आदल्या दिवशी दगडाचे खच लावतात. दिवसभरात या दगडफेकीत शेकडो जखमी होतात, तर कुणी गतप्राण झाल्याच्या नोंदीसुद्धा आहेत. सूर्योदयानंतर हा पळसाचा झेंडा काढून चंडीमातेच्या मंदिरात आणला ज़ाते . आजपर्यंत ७५ वर्षांच्या कालखंडात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
--------------
पांढुर्णा, सावरगावला पोलीस छावणीचे स्वरूप
गोटमार यात्रेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कलम १४४ लागू करण्यात आली असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. याकरिता वज्र दंगा नियंत्रक वाहन, अग्निशमन, रुग्णवाहिकासह ६५० पोलीस, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सात उपविभागीय अधिकारी, नऊ तहसीलदार, २० पोलीस निरीक्षक, १० उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर आणि शेकडो कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
-----------------
पूर्वसंध्येलाच टाकले १७ ट्राॅली दगड
गोटमार यात्रेच्या पूर्वसंध्येलाच पांढुर्णा आणि सावरगावच्या भाविकांनी १७ ट्राॅली दगड आणून रस्त्यावर टाकले. यामुळे गोटमार यात्रेत येणाऱ्यांना सुविधा झाली आहे.
----------------
प्रशासनापुढे आव्हान
अघोरी गोटमार यात्रा बंद व्हावी म्हणून सात वर्षांपूर्वी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने दगडाऐवजी रबरी चेंडूसुद्धा प्रशासनाने दिले होते. परंतु, भाविकांनी ते टाळून गोटमार केली होती, हे विशेष. अनेक वेळा गोटमारीत पोलिसांची वाहनेसुद्धा फुटली आहेत.
--------------
चंडीमातेचा अंगारा हाच उपाय
गोटमारीत शेकडो भाविक जखमी होतात. परंतु, जखमी अवस्थेत चंडी मातेचं दर्शन घेऊन अंगारा लावल्यास चांगले होत असल्याचा भाविकांमध्ये समज आहे. हा प्रघात कायम आहे.