नाफेड खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचीच ‘बल्ले बल्ले’
By Admin | Updated: April 14, 2017 00:09 IST2017-04-14T00:09:10+5:302017-04-14T00:09:10+5:30
किमान आधारभूत किंमत दरामध्ये नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनी ताबा मिळविल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

नाफेड खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचीच ‘बल्ले बल्ले’
शेतकऱ्यांची कुचंबणा : हजारो पोती तूर खरेदीच्या प्रतीक्षेत
धारणी : किमान आधारभूत किंमत दरामध्ये नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनी ताबा मिळविल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. परिणामी या केंद्रावर अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी संगनमत करून खऱ्या शेतकऱ्यांची कुचंबणा सुरू केल्याचे चित्र आहे.
१२ एप्रिल रोजी आदिवासी विकास महामंडळाने तडकाफडकी सायंकाळी नाफेड खरेदी केंद्राचे उद्घाटन संचालक व माजी आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते केले. मात्र, ना बारदाना, ना चाळणी, ना हमाल अशा अवस्थेत बुधवारी एक किलोही तूर खरेदी करण्यात आली नाही. पीएमसीद्वारे मैदानात शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधा न दिल्याने हजारो पोते घेऊन शेतकरी अंधारात ताटकळत पडले होते.
गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रितसर खरेदीला सुरूवात न झाल्याने शेतकऱ्यांत संताप पसरला. इतक्यात खासदार आनंदराव अडसुळांनी खरेदी केंद्राला भेट देऊन व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांचा सातबारा व आधारकार्ड पाहूनच खरेदी करण्याची सूचना दिली. चांगल्या प्रतिच्या तुरीला चाळणी मारण्याचे सबब समोर करून वेळ काढू नका, असेही खासदारांनी बजावले. मात्र त्यांच्या सूचनेलाही तिलांजली देत प्रत्येक पोते चाळणी खरेदी सुरू आहे. २०० पोतेही खरेदी करण्यात न आल्याने शेतकरी संतापले आहेत.
शिवसैनिकांविरोधात रोष
खासदारांसोबत आलेल्या स्थानिक शिवसैनिकांनी खासदारांसमक्षच व्यापाऱ्यांची पाठराखण केल्याने शेतकऱ्यांचा संतापात वाढच झाली. त्यामुळे नाफेड खरेदी केंद्रावर केवळ आणि केवळ व्यापाऱ्यांचाच साम्राज्य असल्याचे चित्र पहावयाला मिळाले.