ट्रॅक्टरचालकाचा मारहाणीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:03+5:302021-02-13T04:15:03+5:30
तिवसा : रेतीच्या तस्करीवरून झालेल्या मारहाणीत एका ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाल्याची घटना धामंत्री येथील रेती घाटात घडली. याप्रकरणी चाैघांविरुद्ध ...

ट्रॅक्टरचालकाचा मारहाणीत मृत्यू
तिवसा : रेतीच्या तस्करीवरून झालेल्या मारहाणीत एका ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाल्याची घटना धामंत्री येथील रेती घाटात घडली. याप्रकरणी चाैघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संकेत मारोतराव भगत (२१, रा. वरखेड) असे मृत ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. ११ फेब्रुवारी रोजी रात्री धामंत्री रेतीघाटात ही घटना घडली.
पोलीस सूत्रानुसार, संकेत हा रेती पात्रात ट्रॅक्टर धुण्यास गेला असता, चाकाखालील दगड उडाल्याने आरोपींनी त्याला लाठीकाठीने मारहाण केली. या मारहाणीत संकेत भगत याचा मृत्यू झाला. तो नेहमीप्रमाणे धामंत्री येथील रेती घाटातून रेती चोरत होता. तेथे वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड येथील चार युवक दारू पिण्यासाठी अमरावती जिल्हयाच्या हद्दीतून आले होते. त्यांचा संकेतशी वाद झाला. हाणामारीदरम्यान संकेतला छाती व गुप्तांगात जबर मारहाण केल्याने त्याचा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी राजू देवराव मारबदे, भीमराव जानराव जवंजाळ, मनोज यशवंत जवंजाळ, भास्कर मधुकर बावणे (रा.सर्व टाकरखेडा, जिल्हा वर्धा) यांचेविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. चारही आरोपी पसार असून मृतक संकेत भगत यांच्यावर त्याच्या गावात शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.