राज्यपक्षी हरियालवर विषप्रयोग; नऊ मृत

By Admin | Updated: March 4, 2017 00:01 IST2017-03-04T00:01:17+5:302017-03-04T00:01:17+5:30

राज्य पक्षी म्हणून मान्यताप्राप्त पाच हरियाल व अन्य प्रजातीच्या चार पक्ष्यांवर विषप्रयोग करून त्यांना ठार मारण्यात आल्याची घटना ...

Toxic poisoning on the state side; Nine dead | राज्यपक्षी हरियालवर विषप्रयोग; नऊ मृत

राज्यपक्षी हरियालवर विषप्रयोग; नऊ मृत

बडनेऱ्यात परप्रांतीयांचा प्रताप : चार संशयित ताब्यात, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
बडनेरा : राज्य पक्षी म्हणून मान्यताप्राप्त पाच हरियाल व अन्य प्रजातीच्या चार पक्ष्यांवर विषप्रयोग करून त्यांना ठार मारण्यात आल्याची घटना बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उजेडात आली. याप्रकरणी वनविभागाने चार संशयिताना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात पिंपळाचे झाड आहे. अनेक वर्षांपासून या झाडांवर हरियाल, बुलबुल, मैना व इतर पक्षांचे थवेच्या थवे वास्तव्यास राहतात. परिसरातील पक्षीप्रेमीदेखील त्यांचे संगोपन, खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. या पिंपळाच्या झाडावर पक्ष्यांसाठी जलपात्राची व्यवस्था आहे. मात्र गत दोन दिवसांपासून पक्षी मृत्यू पावत असल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघडकीस आली. पाच हरियाल, तीन बुलबुल व एक मैना या पक्ष्यांचा विषप्रयोगाने मृत्यू झाल्याची घटना प्राथमिक स्वरुपात समोर आली आहे. रेल्वेस्थानक परिसरातील खुल्या जागेत अनेक दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा जमावडा आहे. येथे परप्रांतीय झोपड्या थाटून राहतात. हाकेच्या अंतरावर पिंपळाचे झाड आहे. अचानक पक्ष्यांचा झालेल्या मृत्यूमुळे घटनास्थळी मुसाफिरांनीच मांस खाण्यासाठी त्यांना मारले असावे, असा अंदाज प्रत्यक्षदर्शनींनी वनविभागाकडे व्यक्त केला. दरम्यान आपले पितळ उघडे पडेल, या भीतीपोटी परप्रांतीय मुसाफीर पसार होण्याचे मनसुबे रचत असताना वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने चार जणांना ताब्यात घेतले. अवैधरीत्या वास्तव्यास असणाऱ्यांनी पक्षाचे मांस खाण्यासाठी त्यांना ठार मारले असावे, असा अंदाज प्राथमिक स्वरुपात वनविभागालादेखील आला. विषप्रयोगातून नऊ पक्ष्यांना मारण्यात आल्याच्या घटनेमुळे शहरवासीयांसह पक्षीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पक्षांच्या अचानक मृत्युप्रकरणी वनविभाग कारणमीमांसा शोधत आहे. पक्ष्यांचा मृत्यू विषप्रयोग अथवा कोणत्या रोगामुळे झाला? याबाबत पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)

हरियाल राज्यपक्षी म्हणून घोषित
हरियाल या पक्षाला राज्य शासनाने राज्यपक्षी म्हणून घोषित केले आहे. वाघ, मोर यासारख्या प्रजातीमध्ये हरियाल पक्षाची गणना आहे. त्याचे संवर्धन, सुरक्षेसाठी वनविभागाला प्रामुख्याने जबाबदारी घ्यावी लागते. हरियाल पक्षी बडनेऱ्यात वास्तव्यास आहे, याची पुसटशी कल्पना वडाळी वनविभागाच्या बडनेरा सर्कल कार्यालयास नव्हती. पक्षांचे मृत्यू झाले, ही माहिती वनविभागाला देण्यात आली. परंतु वनपाल, वनरक्षक आदी तब्बल एक तास उशीराने पोहोचले. त्यांचे आगमन केवळ ‘फोटोशेषण’ ठरले.

रेल्वेस्थानक परिसर असुरक्षित, पोलिसांचे दुर्लक्ष
‘लोकमत’ने रेल्वेस्थानक असुरक्षित असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित केले आहे. मोठ्या संख्येत मुसाफीर येथे वास्तव्यास आहे. मारहाणीच्या घटना वाढलेल्या आहेत. परप्रातांतील लोकांवर रेल्वे पोलिसांसह बडनेरा पोलीस प्रशासनाचा कुठलाच अंकुश नसल्याचे चित्र आहे. परप्रांतीयाचे नियमबाह्य वास्तव्य हे बडनेरा शहरासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

वन्यजीव गुन्हा नोंदविला
बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात एका पिंपळाच्या झाडावर पाच हरियाल व अन्य चार पक्ष्यांच्या मृत्यूप्रकरणी वनगुन्हा नोंदविला आहे. वनगुन्हा क्रमांक १६/२० अन्वये ३ मार्च रोजी नोंदविण्यात आला आहे. ताब्यातील चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती आरएफओ हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी दिली.

Web Title: Toxic poisoning on the state side; Nine dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.