टॉवर उभे; ना नेटवर्क, ना रेंज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST2021-03-09T04:15:29+5:302021-03-09T04:15:29+5:30

पान २ ची बॉटम मोबाईल कंपन्यांकडून आदिवासींची थट्टा चिखलदरा : स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून ...

Tower standing; No network, no range! | टॉवर उभे; ना नेटवर्क, ना रेंज!

टॉवर उभे; ना नेटवर्क, ना रेंज!

पान २ ची बॉटम

मोबाईल कंपन्यांकडून आदिवासींची थट्टा

चिखलदरा : स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटच्या अतिदुर्गम हतरू परिसरात दीड वर्षांपासून खासगी मोबाईल कंपन्यांनी टॉवर उभारले. मात्र, प्रत्यक्षात ते सुरूच न करता मोबाईल कंपन्यांनी आदिवासींची थट्टा चालविली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

शासकीय योजना मुंबईतून निघाल्यानंतर मेळघाटच्या अतिदुर्गम पाड्यापर्यंत कासवगतीने पोहोचत असल्याचा प्रत्यय आदिवासींना नेहमी येतो. तालुक्यातील रुईपठार, हतरू, बिबा, एकताई या चार गावांमध्ये दीड वर्षांपासून खासगी कंपन्यांनी मोबाईलचे टॉवर उभारून ठेवले आहेत. रस्ता, वीज सुविधा नसली तरी किमान मोबाईल सेवा उपलब्ध होत असल्याचा आनंद आदिवासींना होता. प्रत्यक्षात दीड वर्षानंतरही हे टॉवर पांढरे हत्ती ठरले आहेत. टॉवर उभे करून गेलेले अधिकारी-कर्मचारी ते सुरू करण्यासाठी फिरकलेच नसल्याची माहिती पंचायत समितीचे सदस्य नानकराम ठाकरे यांनी दिली. बीएसएनएलची सेवा काटकुंभ व चुरणी परिसरात असली तरी ती सर्वाधिक काळ बंद राहण्याचा विक्रम आहे. त्यामुळे बीएसएनएलबद्दल मेळघाटात प्रचंड संताप व्यक्त आहे.

बॉक्स

संपर्क, ऑनलाइन शिक्षण कोसो दूर

या चार गावांतील मोबाईल टॉवर उभारणीनंतर परिसरातील किमान २० गावांत असलेल्या आदिवासी खेड्यांना शहर व तालुका भागात संपर्क करणे सोपे होईल, अशी अपेक्षा होती. दुसरीकडे वर्षभरापासून लॉकडाऊन असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवता येईल, असे वाटले. परंतु प्रत्यक्षात टॉवर सुरू न झाल्याने मेळघाट आजही संपर्कहीन आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संपर्कहीन गावे संपर्कात आणण्यासाठी मोहीम उघडली होती. परंतु हतरू परिसरातील या चार टॉवरचे घोडे अडलेले आहे.

Web Title: Tower standing; No network, no range!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.